Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

मॉरिशसमधील उद्योजकांपुढे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली महाराष्ट्राची बलस्थानं

By Devendra Fadnavis on April 28th, 2023
Df_Press-Release-Page_Feature-Image

press release

मोका (मॉरिशस), 28 एप्रिल

उद्योगात गुंतवणूक वाढविण्यासाठी ईडीबी-एमआयडीसी यांच्यात सामंजस्य करार

इंडो-मॉरिशस बिझनेस फोरमच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मॉरिशसमधील उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची बलस्थानं सांगत त्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यात गुंतवणुकीसाठी एक व्यासपीठ स्थापन करण्यात येणार असून यासाठी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बोर्ड, मॉरिशस (ईडीबी) आणि एमआयडीसी यांच्यात आज एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यात गुंतवणुकीसाठी सहकार्य वाढविणे, व्यापाराला प्रोत्साहन देणे, यासाठी यंत्रणा विकसित करणे, संस्थागत संबंध वाढविणे, क्षमता निर्माणाचे कार्य करणे आणि आर्थिक संबंधांना चालना देणे, हे उद्देश या सामंजस्य करारातून साध्य केले जाणार आहेत. मॉरिशसचे अर्थमंत्री डॉ. रेनगॅनाडेन पदयाची, परराष्ट्र व्यवहार मंत्री ॲलन गानू, माहिती-तंत्रज्ञान मंत्री दीपक बालगोबिन तसेच भारताच्या उच्चायुक्त नंदिनी सिंगला तसेच मॉरिशसमधील उद्योजक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. ॲलन गानू यांनी येथे निमंत्रित करण्यासाठी मोठा पुढाकार घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार मानत देवेंद्र फडणवीस यांनी आजचा दिवस हा महाराष्ट्र-मॉरिशस यांच्या मैत्री संबंधातील ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र हे भारतातील एक अग्रेसर राज्य आहे. भारताच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा 25% आहे, देशात येणाऱ्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी 28% महाराष्ट्रात येते, औद्योगिक उत्पादनात वाटा 20% आहे. कोविड काळाचा अपवाद सोडला तर महाराष्ट्राचा सीएजीआर (कंपाऊंड ॲन्यूअल ग्रोथ रेट) हा सातत्याने 10% आहे. महाराष्ट्राची 57% लोकसंख्या ही 27 पेक्षा कमी वयाची आहे. सर्वाधिक विद्यापीठे महाराष्ट्रात आहेत. सर्वाधिक वीजनिर्मिती आणि वीजवापर महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राची डेटा क्षमता 65% आहे. महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप राजधानी आहे. 80,000 पैकी 15,000 स्टार्ट अप आणि 100 पैकी 25 युनिफॉर्न हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र हे देशाची व्याघ्र राजधानी सुद्धा आहे आणि 700 किमीचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्य सरकार इज ऑफ डूइंग बिझनेस आणि कॉस्ट ऑफ डूइंग बिझनेस यावर सातत्याने काम करते आहे. आज जो सामंजस्य करार करण्यात आला, त्यामुळे मॉरिशस मधील उद्योजकांना एक मोठे दालन खुले होणार आहे. ‘स्पीड ऑफ ट्रॅव्हल’ आणि ‘स्पीड ऑफ डेटा’ हे महाराष्ट्राचे वैशिष्ट आहे. महाराष्ट्रात एकाहून एक पायाभूत सुविधांची निर्मिती सुरू आहे आणि दुसरीकडे फायबरच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत इंटरनेट पोहोचविले जात आहे. आता त्याला 5-जी तंत्रज्ञानाची जोड प्राप्त होईल. आजचा करार हा महाराष्ट्र-मॉरिशस विकासाचा मानबिंदू ठरेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे कायम राज्यांनी इतर देशांशी संबंध अधिकाधिक वृद्धिंगत करण्यासाठी आग्रही असतात. भारत हा राज्यांमध्ये वास्तव्य करतो, हीच त्यामागची त्यांची भावना आहे. आज जी-20 चे अध्यक्षपद भारताकडे आहे. एक पृथ्वी-एक कुटुंब-एक भविष्य हीच वसुधैव कुटुंबकम् ची भावना घेऊन त्यांच्या नेतृत्वात भारत पुढे चालला आहे. कोरोनाच्या काळात आणि त्यानंतर सुद्धा भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचा वेग कायम राखला आहे, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

(माहितीसाठी कार्यक्रमाची लिंक: https://www.youtube.com/live/MVggk_u2gtk?feature=share )