गडचिरोली, 17 जुलै
देशातील 30 टक्के पोलाद उत्पादन गडचिरोलीतून होणार
सुरजागड इस्पात पोलाद प्रकल्पाचे भूमिपूजन
जिल्ह्यात हजारो कोटीची गुंतवणूक, 80 टक्के स्थानिकांना रोजगार
चामोर्शीतही 35,000 कोटींची गुंतवणूक, 20 हजार रोजगारनिर्मिती
गडचिरोलीची ओळख उद्योगनगरी
येथील निर्माणाधीन सुरजागड पोलाद प्रकल्पातून आठ दशलक्ष टन तर लॉईड्स प्रकल्पातून चार दशलक्ष टन पोलाद उत्पादन होणार आहे. हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर महाराष्ट्रात 30 टक्के पोलाद उत्पादन एकट्या गडचिरोलीतून उत्पादित होणार आहे. त्यामुळे येथे उद्योग व रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत असून माओवादामुळे मागे राहिलेला येथील सामान्य माणूस समृद्धीकडे जात असल्याचे चित्र आपणास मिळेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
सुरजागड इस्पात स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वडाळापेठ, अहेरी येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल, लॉईड्स मेटलचे प्रमुख प्रभाकरन, सुरजागड इस्पात कंपनीचे प्रमुख सुनील जोशी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात सुरू होणार्या उद्योगात 80 टक्के रोजगार स्थानिकांना उपलब्ध करून देण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत. त्याचा स्थानिक नागरिकांना फायदा होणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर बळी पडू नये, हे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यातीन जल, जमीन, जंगल हे वैभव टिकवूनच येथे उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच आदिवासींचे दैवत असलेले ठाकूर देवाजवळ कोणत्याही प्रकारचे उत्खनन होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. चामोेर्शीत सुद्धा 35,000 कोटींची गुंतवणूक होत असून त्यातून 20,000 इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
गडचिरोली जिल्ह्यात विमानतळ, रेल्वेचे काम प्रगतीपथावर आहे. यासोबतच येथे शिक्षण हब तयार करण्यात येत आहे. येथील मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली आहे. 170 कोटींचे इनोव्हेशन सेंटर तयार होत आहे, तसेच शासनाने उच्च व तंत्र शिक्षण घेणार्या मुलींना शंभर टक्के फी सवलत तर मुलांना 50 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. गडचिरोली जिल्हा उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने समृद्धी महामार्गाने मुंबईपर्यंत जोडण्यात येणार आहे. यासोबतच चार्मोशी ते काकीनाडा बंदरापर्यंत मालवाहतुकीसाठी जलमार्ग तयार करण्यासाठी अभ्यास समिती नेमण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी राज्यातील जनसामान्यांचा विकास होण्याकरिता आज आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाला साकडे घालत असल्याचे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील हजारो कोटींची खनिज संपत्ती येथील आदिवासी समाजाला आर्थिक सुबत्ता देऊन जाईल. त्यानिमित्त जिल्ह्यात येणार्या हजारो कोटी गुंतवणुकीचा येथील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. राज्य शासनातर्फे शेतकर्यांना सक्षम करण्याचे काम करण्यात येत आहे. या अनुषंगाने वीजबिलात माफी, धानाला बोनस, दर्जेदार शिक्षण, पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा अशा विविध सवलतीच्या योजनांसोबतच आता महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा दीड हजार रुपये मदत पात्र महिलांना देण्याची योजना आमचे शासन राबवत असल्याचे ते म्हणाले. गडचिरोली हे महाराष्ट्राच्या विकासाचे केंद्र बनेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
उद्योग मंत्री उदय सामंत यावेळी बोलताना म्हणाले की, दावोस कराराच्या अंमलबजावणीचे उदाहरण म्हणजे आजचा भूमिपूजन होणारा हा कार्यक्रम आहे. येथे अजून 35 हजार कोटीचे प्रकल्प सुरू होणार आहे. तसेच मोठ-मोठ्या कंपन्या येथे उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक असल्याने एकंदरीत उद्योगनगरी असे गडचिरोलीचे नामकरण होणार असल्याचे ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या जिल्हा गुंतवणूक परिषदेअंतर्गत नागपूर विभागात तब्बल 5 हजार कोटींचे उद्योग येणार असून पुढील एक ते दोन महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात दीड लाख कोटीचे प्रकल्प येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रात शिक्षण, सिंचन आणि रोजगार निर्मितीचे लक्ष पूर्ण करून क्रांती घडवून आणायची असल्याचे सांगितले. हा प्रकल्प 10 हजार कोटी रुपयांचा असून यातून 7 हजार पेक्षा अधिक स्थानिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. संपूर्ण प्रकल्प 2030 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कंपनीत नियुक्त 16 सुरक्षारक्षकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. याशिवाय स्टील प्लांटतर्फे रुग्णवाहिका व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला उद्योग क्षेत्रातील मान्यवर, संबंधित अधिकारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.