इंदूर, 18 सप्टेंबर
देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यप्रदेश प्रचारसभा
सनातन धर्माला संपविण्याची भाषा करुन स्वत:ला धर्मनिरपेक्ष सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे हा निव्वळ मुर्खपणा आहे. सनातन धर्म कधीच संपणार नाही, उलट तो संपविण्याची भाषा करणारेच संपतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मध्यप्रदेश येथे केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कालपासून मध्यप्रदेशच्या दौर्यावर आहेत. काल उज्जैन येथे त्यांनी बाबा महाकालचे दशर्र्न घेतले आणि मनोभावे पूजाअर्चा केली. आज सकाळपासून त्यांनी जनआशिर्वाद यात्रांमध्ये सहभाग घेतला आणि इंदूर, धार, कालीबिल्लोद, बेटमा, महू येथे जाहीर सभांना, बैठकांना संबोधित केले. या सभांना मंत्री मोहन यादव, राजवर्धन सिंग, विक्रम वर्मा आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सनातन धर्म ही आपली प्राचीन संस्कृती आहे. देशात कुणीही इतरांच्या धर्माबद्दल बोलू नये. पण, अन्य कुठल्या धर्माबद्दल कुणी बोलले तर मोठा गहजब होतो. सनातन धर्म संपविण्याची भाषा करणे आणि त्यातून स्वत:ला धर्मनिरपेक्ष सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे, यापेक्षा दुसरा कोणता मुर्खपणा असूच शकत नाही. सनातन धर्म तर कधीच संपणार नाही. पण, त्याविरोधात जे विचार व्यक्त करतील, ते स्वत:च संपल्याशिवाय राहणार नाही. सनातन धर्मावर जेव्हा-जेव्हा आक्रमण झाले, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी त्याचा विरोध केला. अहिल्यादेवी होळकर यांनी तर अनेक मंदिरांचे पुनर्निमाण केेले, हा इतिहास आहे.
ज्या प्रदेशात काँग्रेसने कोणती गॅरंटी दिली, तेथे त्यापैकी एकही वचन ते पूर्ण करु शकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षांत नागरिकांच्या जीवनात जो बदल केला, तो प्रत्यक्ष जमिनीवर दिसतो आहे. आज इंडी आघाडीत कुणीच कुणाला नेता मानायला तयार नाही. आघाडी एकमेकांना सामावून घेणारी असते. येथे मात्र तसे चित्र नाही. एका पक्षाचे दुुसर्या राज्यात अस्तित्त्व नाही, असे पक्ष एकत्र येऊन काहीच फायदा होत नसतो. राहुल गांधी सकाळी काय म्हणतात, ते त्यांना रात्री ठावूक नसते आणि रात्री जे बोलले ते दुसर्या दिवशी सकाळी त्यांना आठवत नाही, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.
भाजपा सरकार असते, तेथे नेहमीच गरिबांच्या कल्याणाचा विचार होतो. काँग्रेसने ‘गरिबी हटाओ’चा नारा दिला. पण, तेथे केवळ नेत्यांची गरिबी हटली. जनतेची गरिबी कधीही संपली नाही. आज गरिब कल्याणाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना त्यांचा अधिकार देण्याचे काम पंतप्रधान मोदी यांच्या गेल्या 9 वर्षांत झाले आहे. इंडी आघाडीचा एकाच अजेंडा आहे, मोदी हटाव. कारण त्यांना ठावूक आहे, आणखी 5 वर्षांसाठी मोदीजी आले, तर त्यांची दुकाने बंद होणार आहेत, अशीही टीका देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.