Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

पुण्यातील घटना अतिशय गंभीर

By Devendra Fadnavis on May 21st, 2024
Df_Press-Release-Page_Feature-Image

press release

पुणे, 21 मे

कुणालाही सोडणार नाही: देवेंद्र फडणवीस

स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही, याकडे पालकांनीही लक्ष द्यावे!

पुणे पोलिस आयुक्तालयात वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत आढावा

पुण्यातील हिट अँड रनच्या घटनेची गंभीर दखल घेत, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज थेट पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात पोहोचले आणि तेथे त्यांनी आढावा घेतला. ही घटना अतिशय गंभीर असून, कुणालाही सोडणार नाही, असा इशारा देतानाच स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही, याकडे पालकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पोहोचताच, पोलिस विभागाची बैठक घेतली. आतापर्यंत काय तपास झाला, पुढची कार्यवाही काय आणि यापुढे अशा घटना घडू नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाय याबाबत माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पोलिसांनी या घटनेत भादंविचे 304 हे कलम लावले आहे, 304 अ लावलेले नाही. त्यामुळे प्रारंभीच कठोर भूमिका घेण्यात आली. या प्रकरणातील मुलगा हा 17 वर्ष 8 महिन्याचा आहे. पण, निर्भया प्रकरणानंतर जे बदल कायद्यात झाले, त्यानुसार, गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलाला सुद्धा सज्ञान मानण्यात यावे, अशी तरतूद आहे. तसेही पोलिसांनी आपल्या पहिल्याच अर्जात नमूद केले आहे. पण, बाल न्यायाधिकरणाने पोलिसांची भूमिका ऐकून घेतली नाही. त्यांनी सामाजिक सुधारणांसंबंधीचे आदेश दिले आणि त्यातून आणखी जनक्षोभ झाला. पोलिसांनी तत्काळ वरिष्ठ न्यायालयात अर्ज केला आणि न्यायालयाने त्याची दखल घेतली. कायद्यानुसार, बाल न्यायाधीकरणाच्या आदेशावर फेरविचार करायचा असेल तर पुन्हा त्याच न्यायालयात जावे लागते आणि त्यांनी फेरविचार केला नाही तर वरच्या न्यायालयात दाद मागता येते. त्यामुळे कायद्यानुसार, ती कार्यवाही करण्यात येत आहे. वरिष्ठ न्यायालयाने घेतलेली भूमिका पाहता निश्चितपणे बाल न्यायाधीकरण फेरविचार करेल, अशी आम्हाला खात्री आहे.

कुणालाही दारु पिऊन, बिनानंबरची गाडी चालविण्याचा आणि लोकांचे जीव घेण्याचा अधिकार नाही. या प्रकरणात न्याय निश्चितपणे होईल. बारचे जे परवाने देण्यात आले, तेथे परवान्यातील अटींचे पालन होते की नाही, हे तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे अटींचे पालन करीत नसतील, ते बार बंद करण्यात येतील. शिवाय वय आणि ओळख याची पडताळणी केल्यानंतरच बारमध्ये प्रवेश दिला पाहिजे, याचेही काटेकोरपणे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. नाकाबंदी करुन ड्रंक अँड ड्राईव्हविरोधी मोहीम नियमितपणे राबवावी, याचेही निर्देश देण्यात आले आहेत. पालकांनी सुद्धा स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे. बाल न्याय मंडळाच्या पुढच्या आदेशानुसार याप्रकरणात पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसेच पोलिसांकडून कोणती वेगळी वागणूक मिळाली असेल तर सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या पोलिसांना बडतर्फ करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.