अहमदाबाद, 30 नोव्हेंबर
काँग्रेस अध्यक्षांच्या विधानाचा देवेंद्र फडणवीसांकडून निषेध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावण संबोधणार्या मल्लिकार्जून खडगे यांच्या विधानाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. ज्यांनी शेकडो वर्षे जुना राममंदिराचा प्रश्न सोडविला त्या मोदीजींवर, रामजन्मावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा काँग्रेस पक्ष आरोप करतो, यातूनच हा पक्ष किती खचला आहे, हे स्पष्ट होते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारदौर्यावर आले असता, अहमदाबाद येथे पत्रकारांशी ते संवाद साधत होते. माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेस पक्षाकडे नेता नाही आणि नीतीही नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांच्या वक्तव्याचा केवळ आम्हीच नाही, तर संपूर्ण देश निषेध करतोय. एक बाब लक्षात घ्या की, जेव्हा-जेव्हा मोदींबाबत अपशब्द वापरले गेले, तेव्हा-तेव्हा संपूर्ण देशाने आपला कौल मोदींना दिला आहे. गुजरातमध्ये भाजपा आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडणार आणि काँग्रेसची आजवरची सर्वांत खराब कामगिरी या निवडणुकीत दिसेल. आज काँग्रेस पक्ष आपल्या अस्तित्त्वाचा शोध घेतो आहे. जितके गट आहेत, तितक्या दिशांना तो पक्ष भरकटतो आहे. पायाभूत सुविधा, शेती अशा क्षेत्रात भरीव काम करणार्या भाजपाने येणार्या काळात सुद्धा गुजरातेत अनेक योजनांचा संकल्प केला आहे. समान नागरी कायदा टप्प्या-टप्प्याने सर्व राज्य करीत आहेत. समान नागरी कायदा लागू करण्याची जबाबदारी संविधानाने आपल्यावर टाकली आहे, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
(माहितीसाठी लिंक : https://youtu.be/JHpwfQse_vg )