मुंबई, 24 नोव्हेंबर
सर्वोच्च न्यायालयापेक्षा या देशात कुणीही मोठे नाही!
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा नाईलाज झाला आणि त्यांनाही बोलावेच लागले, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उद्धव ठाकरे यांना लगावला. मुंबई येथे ते पत्रकारांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी काही मत मांडले, त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती उदयनराजे यांनी आपल्या पत्रात काही मुद्दे उपस्थित केले आणि त्यानंतर पवार साहेबांना त्यावर मत मांडावे लागले. आपल्या समोर घटना घडली आणि आपण त्यावर प्रतिक्रिया दिली नाही, हे छत्रपती उदयनराजेंनी लक्षात आणून दिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आज पवार साहेबांनी दिली. आता पवार साहेब बोलल्यावर उद्धव ठाकरे यांना बोलणे क्रमप्राप्तच होते. या संपूर्ण विषयाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न चाललेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचे दैवत आहेत, आदर्श आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल कुठला वादही होऊ शकत नाही. त्यामुळे त्यावर राजकारण करणे योग्य नाही. उद्धव ठाकरे काय बोलले मी ऐकलेले नाही. त्यामुळे त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. पवार साहेब बोलले की उद्धवजींना बोलावेच लागते, त्यामुळे ते बोलले असतील.
राज्य निर्मिती झाली तेव्हापासून सीमा प्रश्न आहे. महाराष्ट्राने आपली भूमिका प्रारंभीपासूनच पक्की ठेवली आहे. आपल्या देशात संविधान आहे आणि संविधानाने राज्यांना अधिकार दिले आहेत. आम्ही आमची भूमिका घेऊन सुप्रीम कोर्टात गेलो आहोत. सगळे पुरावे आपण सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहेत. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय घेईल, याची आम्हाला खात्री आहे. सर्वोच्च न्यायालयापेक्षा कुणीही मोठे नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री सुद्धा सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत किंवा इतर कुणीही नाही. त्यामुळे त्यांनी कोणताही दावा केला तरी महाराष्ट्रातील एकही गाव जाणार नाही. आमचा सीमाभाग आम्हाला परत मिळेल, ही आम्हाला अपेक्षा आहे. मी कुठलेही चिथावणीखोर वक्तव्य केलेले नाही. मी इतकेच सांगितले की, बेळगाव, कारवार, निपाणीसह जी गावं आहेत, ती महाराष्ट्रात असतील आणि सर्वोच्च न्यायालयातून आम्हाला न्याय मिळेल. आमच्यापेक्षा जास्त काळ काँग्रेसचे सरकार केंद्रात, महाराष्ट्रात आणि कर्नाटकात होते. मग हा प्रश्न सुटला का, असाही सवाल सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला. सीमा प्रश्नात आजवर कधीच पक्षीय वाद आले नाहीत, या नंतर सुद्धा येऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
(माहितीसाठी संवादाची लिंक : https://youtu.be/Hr4P7-VMCAg )