नागपूर, 24 मे
अंबाझरी तलाव, क्रेझी कॅसल, एनआयटी स्केटिंग रिंग, डागा ले आऊट, अंबाझरी घाट, रामदासपेठ इत्यादी भागात केली कामांची पाहणी
अंबाझरी तलाव परिसरात प्रशासनाच्या वतीने दीर्घ आणि अल्पमुदतीच्या उपाययोजना करण्यात येत असून 30 जूनपूर्वी अल्पमुदतीची सर्व कामे पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या भागात पाहणी केल्यानंतर दिली. अल्पमुदतीची ही सुमारे 21 कोटी रुपयांची कामे आहेत, तर दीर्घमुदतीची सुमारे 204 कोटींची कामे आहेत.
गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे पूर आल्यानंतर महापालिका, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयातून एक अल्प आणि दीर्घमुदतीचा आराखडा तयार करण्यात आला होता. दीर्घ मुदतीच्या उपाययोजनेंतर्गत तलावाच्या बळकटीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. हे काम अंतिम टप्प्यात असून येत्या 15 ते 20 दिवसात ही कामे पूर्ण होणार आहेत. पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी तीन गेटचे काम पूर्ण होण्यास 6 महिने लागतील. मात्र तुर्तास पाणी पातळी वाढल्यास ते बाहेर काढण्यासाठी एक चॅनल तयार करण्यात आले आहे. पाण्याचा सांडवा वाहून जाण्यासाठी पुलाचा अडथळा निर्माण झाला होता. या पुलाची उंची वाढविण्याच्या दृष्टीने पुल तोडून निर्माणकार्य सुरु आहे. पुलाचा एक भाग येत्या 10 जूनपर्यंत पूर्ण करण्यात येईल तर दुसरा भागही वेळेत पूर्ण करण्यात येईल. तात्पुरत्या उपाययोजनांचा संपूर्ण टप्पा लवकरच पूर्ण होईल, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
एनआयटी स्केटिंग रिंगच्या पार्किंग परिसरातील भाग तोडून नदीपात्र विस्तार करण्याचे कामही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. आकस्मिक स्थितीत धरणातील पाणी व्यवस्थितपणे वाहून जाण्यासाठी या भागातील सर्व नदी नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरणाची कामेही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येतील. धरणाच्या स्टॅटीक भिंतीसमोरील बांधकाम तज्ज्ञ समितीच्या सूचनेनुसार करुन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. या भागात सांडवा वाहून जाण्यास सुलभता येण्यासाठी काही भाग काढून चॅनल सुरु करण्यात येईल, यामुळे या भागातील पाणी वाहून जाण्यास कुठलाही अडथळा येणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अंबाझरी धरणाचा सांडवा वाहून जाण्यासाठीच्या उपाययोजनेंतर्गत स्टॅटीक भिंतीशेजारील कामे, पूल निर्माण कामांची पाहणी केली. यानंतर त्यांनी क्रेझी कॅसल, एनआयटी स्केटिंग रिंग, डागा ले आऊट, अंबाझरी घाट, रामदासपेठ परिसरातील नदी, नाले खोलीकरण व रुंदीकरणाची तसेच पूलाच्या बांधकामांची पाहणी केली. यावेळी संदीप जोशी, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त महापालिका आयुक्त आंचल गोयल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.