Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

पहिल्या दिवशीचे गुंतवणूक करार 6,25,457 कोटींवर

By Devendra Fadnavis on January 22nd, 2025
Df_Press-Release-Page_Feature-Image

press release

दावोस, 22 जानेवारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या अनेक कंपन्यांच्या भेटी

महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी केले निमंत्रित, टाटा समूह 30,000 कोटी गुंतवणूक करणार

दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 6,25,457 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे, हा एक नवा विक्रम आहे. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. टाटा समूह 30 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

काल्सबर्ग समूहाचे सीईओ जेकब अरुप अँडरसन यांची त्यांनी भेट घेतली. काल्सबर्ग समूहाने महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित केली असून, त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे प्रबंध संचालक एमए युसुफ अली यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यांनी नागपुरात गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केली असून, महाराष्ट्रातही त्यांनी विस्तार करण्याची तयारी दर्शविली आहे.

रिन्यू पॉवरचे अध्यक्ष आणि सीईओ सुमंत सिन्हा यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. बीड जिल्ह्यात 15,000 मेवॉ पाईपलाईन आणि पवनऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली.

शिंडर इलेक्ट्रीक इंडियाचे प्रबंध संचालक आणि सीईओ दीपक शर्मा यांचीही त्यांनी भेट घेतली. जागतिक बँकेच्या मदतीने राज्यातील आयटीआयच्या सक्षमीकरण कार्यक्रमात तसेच ऊर्जा क्षेत्रात एआयच्या वापराबाबत सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. अहिल्यानगर आणि नाशिक येथे विस्तार करण्याच्या त्यांच्या योजनांचेही सूतोवाच त्यांनी केले.

मास्टरकार्ड, एपीएसीचे अध्यक्ष लाईंग हाई यांचीही त्यांनी भेट घेतली. लुईस ड्रेफसचे सीईओ मायकेल ग्लेंची यांच्याशी शेती, अन्नप्रक्रिया, आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि वित्तीय क्षेत्राबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. शेतीच्या क्षेत्रात अधिक सहकार्य वाढविण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली.

कॉग्निझंटचे सीईओ रविकुमार एस. यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.