Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

पहाटेचा शपथविधी : उर्वरित सत्य सुद्धा बाहेर येईलच!

By Devendra Fadnavis on February 23rd, 2023
Df_Press-Release-Page_Feature-Image

press release

लोणी, (जिल्हा नगर), 23 फेब्रुवारी

राष्ट्रवादीतील सर्व भावींना मन:पूर्वक शुभेच्छा: देवेंद्र फडणवीस

हळूहळू जे गौप्यस्फोट होताहेत, हे चांगलेच आहेत. मी जे बोललो तेच खरे होताना दिसते आहे. आतापर्यंत अर्धेच बाहेर आले आहे. अजून अर्धी गोष्ट बाहेर यायची आहे. काळजी करु नका, संपूर्ण गोष्ट सुद्धा बाहेर येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

नगर जिल्ह्यातील लोणी येथे आयोजित महसूल परिषदेला संबोधित केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आज सकाळी सुप्रिया सुळे या भावी मुख्यमंत्री असे फलक लागल्यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारले असता ते म्हणाले, भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री अशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पद्धत आहे, त्यामुळे ते तसे सांगतात. उद्धव ठाकरे कधी मुख्यमंत्री होतील, असे कुणाला वाटले तरी होते का, राजकारणात काहीही होत असते. त्यामुळे ज्याला ज्याला जे-जे भावी वाटत असेल, त्याला त्यासाठी शुभेच्छा आहेत.

पोटनिवडणुकीत प्रचाराला जात असल्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता फडणवीस म्हणाले की, सर्वच पोटनिवडणुकांमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गेले आहेत. आता यंदाच्या पोटनिवडणुकीत स्वत: शरद पवार गेले आहेत. यापूर्वीच्या कोणत्याही पोटनिवडणुकीत ते गेले नाही. त्यांना काही ना काही वाटत असेल म्हणून तर स्वत: पवार साहेब जात आहेत ना? आणि तशीही निवडणुकीत मतदारांना भेटताना लाज कशाची?

आमची वैचारिक विरोधक आहोत, शत्रू अजीबात नाही. महाराष्ट्रात एक वेगळी राजकीय संस्कृती आहे. अलिकडच्या काळात एक शत्रूत्त्वाची भावना पहायला मिळते. पण, ती आपल्याला संपवावी लागेल. उद्धवजी आणि आदित्य यांनी वेगळा राजकीय मार्ग पत्करला, आमचा मार्ग वेगळा आहे. त्यामुळे आम्ही शत्रू नाही, तर वैचारिक विरोधक आहोत, असे एका प्रश्नाच्या उत्तरात फडणवीस म्हणाले. शिवसेनेतील फूट फडणवीसांनी केली, या आरोपांसंदर्भात पत्रकारांनी विचारले असता संजय राऊतांना माझी क्षमता अधिक वाटत असेल. त्याबद्दल त्यांचे आभार मानू या. पण, अलिकडे संजय राऊत जे बोलतात ते अजीबात गांभीर्याने घेण्यासारखे नसतात. ते एका राजकीय पक्षाचे प्रवक्ते आहेत, त्यामुळे त्यांनी वस्तुस्थिती पाहून किंवा लोकांना खरे वाटेल, असे बोलले पाहिजे. अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेसंदर्भात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे बैठक झाल्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळात तो प्रस्ताव जाईल आणि या प्रकल्पासाठी कुठलाही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

या महसूल परिषदेत मोजणीच्या संदर्भातील चांगली व्यवस्था, वाळूसंदर्भातील अडचणी सोडविण्याचा तसेच व्यवस्था अधिक पारदर्शी करण्यासंदर्भातील पद्धतींवर चर्चा झाली. गैरकृषीसंदर्भातील समस्यांचे निराकरण, एकाच अर्जावर इतर प्रमाणपत्र, जलयुक्त शिवार योजना टप्पा 2 तसेच आवास योजना मिशन मोडवर राबविणे, कृषीफीडर सौरउर्जेवर आणणे आणि किमान 4000 मे. वॅ. वीज सौरउर्जेवर आणणे इत्यादींबाबत यावेळी चर्चा झाली. या परिषदेमुळे महसूल विभागाच्या कामाला चांगली गती येईल, असा पूर्ण विश्वास मला आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

(माहितीसाठी भाषणाची लिंक: https://www.youtube.com/live/pBpVtxbyFYg?feature=share )