धाराशिव, 16 जून
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारताचा संपूर्ण जगात जो गौरव झाला आणि होतोय् तो अभूतपूर्व आहे आणि एक देशवासी म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धाराशिव येथे केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित राज्यव्यापी संपर्क अभियानांतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज धाराशिवमध्ये जाहीर सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, उस्मानाबादचे धाराशिव झाल्यावर आज येथे पहिल्यांदाच आलो. आमचे सरकार आल्यावर औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर केले, उस्मानाबादचे धाराशिव केले. आम्ही प्रस्ताव पाठविले आणि मोदीजींनी त्याला त्वरित मंजुरी दिली. विकास आणि विरासत अशा दोन्ही आघाड्यांवर मोदी सरकार हे उत्तम काम करते आहे.
कर्नाटक सरकारने वीर सावरकर, डॉ. हेडगेवार यांना अभ्यासक्रमातून काढून टाकले. धर्मांतराला प्रोत्साहन मिळेल, असे निर्णय घेतले. वीर सावरकरांच्या या अपमानावर उद्धव ठाकरेंना काय म्हणायचे आहे? हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे हिंदूत्त्व सोडून दिले, हे एकदा त्यांनी जाहीर करून टाकावे. सत्तेसाठी लाचारी पत्करणार तरी किती, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला. ते म्हणाले की, जगात केवळ 5 देश कोविडची लस तयार करू शकले, त्यात माझा भारत देश होता, याचा मला अभिमान आहे. ही लस तयार झाली नसती, तर जगापुढे हात पसरावे लागले असते आणि ती लस त्यांनी आधी त्यांच्या नागरिकांसाठी वापरली असती. आज जगात अनेक देशांत मंदीचे वातावरण. पण, भारताची वेगाने आर्थिक प्रगती होते आहे. कोविड काळात अर्थकारणात विविध घटकांना दिल्या गेलेल्या पॅकेजचा त्यात महत्त्वाचा हातभार आहे.
आई भवानीच्या चरणी जी रेल्वे येणार होती, त्याला गेल्या 2.5 वर्षांत एक रुपयाही निधी मविआने दिला नाही. केंद्राने अर्धे पैसे देण्यासाठी तयारी दर्शविली. पण, महाविकास आघाडीने पत्र पाठवून आम्ही पैसे देणार नाही, असे सांगितले. आता आमच्या सरकारने 452 कोटी रुपये सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्गासाठी मंजूर केले आहेत. कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी 11,700 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. पुढच्या जूनपर्यंत तुमच्यापर्यंत पाणी पोहोचेल, असे नियोजन केले आहे. धाराशिवमध्ये मेडिकल कॉलेजची नवीन इमारत बांधणार, त्यासाठी जागाही देणार. टेक्निकल टेक्सटाईल पार्क धाराशिवमध्ये होणार, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या तसेच राज्यातील सरकारच्या गेल्या 11 महिन्यांतील विविध उपलब्धी सुद्धा त्यांनी यावेळी सांगितल्या.