माण (सातारा), 22 जून
केवळ तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने महाराष्ट्रात सरकार कसे चालविले, हे जनतेने पाहिले आहे आणि म्हणूनच जनतेने ते पंक्चर केले. आता तसेच विरोधकांची आघाडी सुद्धा या देशातील जनता पंक्चर करेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
केंद्रातील मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, उद्या विरोधी पक्षांचे काही नेते पाटण्यात एकत्र येतील. हातात हात घेतील आणि एक फोटो काढून घेतील. यांचा नेता काही ठरत नाही. मला खात्री आहे, महाविकास आघाडीप्रमाणेच ही आघाडी सुद्धा पंक्चर होईल. जनतेचा आशिर्वाद केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याचसोबत राहील.
माणच्या दुष्काळमुक्तीची लढाई सुरू आहे, तोवर मी कायम तुमच्यासोबत आहे, असे सांगताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन आपण केले. 15 हजार हेक्टर सिंचन यामुळे मिळणार असून, डिसेंबर 2024 मध्ये पाणी येणे सुरू होईल. यासाठी 370 कोटी रुपये दिले आहेत, निधी कमी पडू देणार नाही. आपले सरकार आले असते, तर टेंभूची फेरमान्यता आधीच झाली असती. पण, मविआला निर्णयलकवा होता. आता आम्ही 11 महिन्यात 8 लाख हेक्टर सिंचनाच्या प्रकल्पांना फेरमान्यता दिली. पुढच्या एक महिन्यात 2000 कोटींची मान्यता देणार आहोत. यामुळे कराड, माण, खटाव, कवठे महांकाळ, आटपाटी इत्यादी सर्व दुष्काळी भागांना फायदा होणार आहे.
म्हसवड येथे एमआयडीसी करायला सुद्धा आपण मान्यता दिली होती. पण, अडीच वर्षांत अख्खी एमआयडीसी चोरीला गेली. आता हे सरकार ती करणार. 15 वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते, 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकार होते. पण, ज्या सातार्याने त्यांना भरभरून दिले, तेथील सिंचन प्रकल्प का पूर्ण झाले नाहीत, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.