Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

मॉरिशस आणि एनसीआय-नागपूर यांच्यात सामंजस्य करार!

By Devendra Fadnavis on August 19th, 2024
Df_Press-Release-Page_Feature-Image

press release

मुंबई, 19 ऑगस्ट

मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट, नागपूर आणि मॉरिशस सरकार यांच्यात आज मुंबई येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली असून, मॉरिशसमधील कॅन्सर उपचारात आता नागपूरचा फार मोठा सहभाग राहणार आहे.

मॉरिशसचे केंद्रीय मंत्री अ‍ॅलन गानू आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार, मॉरिशसमधील कर्करोग रुग्णांना नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय सेवा मिळू शकेल. त्याचप्रमाणे मॉरिशसमधील रुग्णालयांमध्ये कार्यरत आरोग्य कर्मचारी, नर्सेस इत्यादींना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सुद्धा नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटवर राहील. या सामंजस्य कराराच्या वेळी मॉरिशसचे कौन्सिल जनरल अरविंद बख्तावार, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटचे सीईओ शैलेश जोगळेकर आणि वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक उपस्थित होते.

मॉरिशस येथील महाराष्ट्र भवनासाठी राज्य सरकारतर्फे जाहीर 8 कोटी रुपयांचा धनादेश प्रदान करण्याच्या सोहोळ्यासाठी मॉरिशसचे केंद्रीय मंत्री अ‍ॅलन गानू हे नागपूर येथील अधिवेशनादरम्यान, नागपूर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटला भेट दिली आणि तेथील अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पाहून ते भारावून गेले होते. त्याचवेळी असा सामंजस्य करार करण्याचे सूचोवाच त्यांनी केले होते आणि त्यातूनच आजचा दिवस साकारला.

या सामंजस्य करारानंतर बोलताना मॉरिशसचे मंत्री अ‍ॅलन गानू म्हणाले की, या करारामुळे महाराष्ट्र आणि मॉरिशसचे संबंध आणखी सुदृढ होतील. आमच्या देशात 18 वर्षांपर्यंतच्या कर्करोग रुग्णांना मोफत उपचारांची सुविधा दिली जाते. अलिकडेच ती वयोमर्यादा वाढवून 25 करण्यात आली आहे. या करारामुळे मॉरिशसमधील रुग्णांना सुद्धा आता चांगल्या आरोग्यसुविधा प्राप्त होणार आहेत. हा करार देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होतो आहे, याचा मला विशेष आनंद आहे.

याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राने कायमच स्वत: समृद्ध होताना जगाला मदतीचा हात देऊ केला आहे. अ‍ॅलन गानू हे तर आमचे अतिशय जवळचे मित्र आहेत. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा लोकार्पणासाठी मॉरिशसला गेलो होते. आपली मराठी परंपरा तेथे इतक्या चांगल्याप्रकारे जपली जाते, याचा मला विशेष आनंद झाला. या करारामुळे महाराष्ट्र आणि मॉरिशसच्या संबंधात नागपूरचा आणखी एक नवा आयाम जोडला जाणार आहे, याचा मला विशेष आनंद आहे.