नागपूर, 14 ऑक्टोबर
विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष श्री मनोहरराव म्हैसाळकर यांच्या निधनाने साहित्याचा एक उत्कृष्ट जाणकार आणि एक उत्तम संघटक आपल्यातून निघून गेला असल्याची शोकसंवेदना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंवेदनेत देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मनोहररावांच्या निधनाने केवळ एका उत्तम साहित्यिकच नाही, तर एक चांगला संघटक, व्यवस्थापक, खेळाडू आपल्यातून हिरावून गेला आहे. अनेक दिग्गज साहित्यिक आणि लेखकांना एका सूत्रात बांधण्याचे काम मनोहररावांनी केले. मनोहररावांचे आशिर्वाद असले की, साहित्यातील कुठलेही आयोजन यशस्वीच होते, अशी त्यांची ख्याती. आताही वर्ध्यातील आगामी 96 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. केवळ विदर्भ साहित्य संघच नव्हे, तर अनेक संस्थांशी त्यांचा अतिशय जवळून संबंध आला. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला. संपर्कात आलेल्या अनेक संस्था त्यांनी वि. सा. संघाशी जोडल्या. या जाणकार साहित्यिकाचे निधन ही साहित्यजगताची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.