Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला

By Devendra Fadnavis on October 9th, 2024
Df_Press-Release-Page_Feature-Image

press release

मुंबई, 9 ऑक्टोबर

देवेंद्र फडणवीस यांची रतन टाटांना श्रद्धांजली

ज्येष्ठ उद्योगपती श्री रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे, त्यांच्या निधनाने मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदनेत म्हटले आहे.

श्री रतन टाटा एक यशस्वी उद्योजक तर होतेच. पण, त्यापलिकडे ते देशाला ठावूक होते. कायम समाजाचा विचार, माणुसकी आणि विनम्रतेचे ते मूर्तिमंत होते. शिक्षण, ग्रामोन्नती आणि कुपोषण, आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अतिशय उल्लेखनीय असेच आहे. देशाच्या आर्थिक विकासासोबतच मानवतेच्या विकासात त्यांनी लावलेला हातभार अत्यंत मोठा आहे. समाजातून कमावलेले समाजालाच परत केले पाहिजे, या श्रद्धेनेच ते कायम जगले. फार पूर्वी टाटा ट्रस्टने कँसर रुग्णांसाठी सुरु केलेल्या सुविधा असोत, किंवा अलिकडे मुंबईत सुरु केलेले प्राण्यांचे रुग्णालय हे त्यांच्यातील करुणेचा परिचय देते. रतन टाटा यांच्यासोबत अनेकदा भेटीची संधी मला प्राप्त झाली. मुख्यमंत्री असताना राज्यात व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशनची निर्मिती आम्ही केली, त्यावेळी बहुतेक बैठकांना ते येत असत. अतिशय सक्रिय राहून त्यांनी राज्य सरकारसोबत काम केले होते. त्याच काळात राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’चे आयोजन केले, तेव्हाही ते सातत्याने सोबत होते. नागपुरात आम्ही नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटची स्थापना केली, तेव्हा सातत्याने त्यांचे मार्गदर्शन आणि सक्रिय पाठिंबा प्राप्त झाला. त्यांचे जाणे, ही महाराष्ट्राची, देशाची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.