मुंबई, 13 जुलै
भिवंडी: भाजपा ‘महाविजय-2024’ या कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. राष्ट्रीय सरचिटणीस, महाराष्ट्र प्रभारी सी टी रवीजी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, भाजपाचे राज्यातील केंद्रीय मंत्री, राज्य सरकारमधील मंत्री, सर्व खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी, लोकसभा आणि विधानसभा प्रमुख या कार्यशाळेत सहभागी होते.
यावेळी मांडलेले मनोगत पुढीलप्रमाणे:
आज जेव्हा भेटतोय, तेव्हा सरकारला एक वर्ष पूर्ण झालेले… सोबत नवीन सहकारीही आले, जनतेच्या मनात प्रश्न तसे तुमच्याही मनात प्रश्न.
भारतीय राजकारणातील उपहास झालेला पक्ष ते जगातील सर्वांत मोठा पक्ष हा आपला प्रवास. जनसंघ ते भाजपा हा आपला प्रवास… आपण किती मोठं विष पचवलं, अख्खं अस्तित्त्वच संपविले. मोरारजी देसाई यांना पंतप्रधान करण्याचे काम आपल्या पाठिंब्याने झाले. हे काम आपण करू शकलो, त्याला कारण होते. संयम आणि विश्वास!
नेशन फर्स्ट हीच कायम आपली भूमिका. भाजपा मोठे होण्याचा सर्वांत मोठा मंत्र कोणता? तो आहे विश्वास पक्षावर, विश्वास पक्ष नेतृत्त्वावर, विश्वास स्वत:च्या क्षमतेवर, निष्ठेवर…
समुद्र मंथन : अमृत आणि विष दोन्ही! भगवान शिवशंकराने विष कंठात ठेवले आणि अमृत सृष्टीला दिले. समाजामध्ये सुद्धा असे मंथन होत असते. परिवर्तनाची प्रक्रिया जेव्हा असते, तेव्हा संयम आणि विश्वास आवश्यक.
काही लोक शपथा खोट्या घेतात. मला खात्री आहे, त्यांनी नक्की म्हटले असेल राजकारणासाठी अशी खोटी शपथ घ्यावी लागते. त्यांनी मनोमन पोहरादेवीची माफी मागितली असेल आणि पोहरादेवी त्यांना माफ करो.
2019 ला कोण मुख्यमंत्री होणार हे आधीच ठरले होते. ते सर्वाशी बोलून झाले होते. पण त्यांनी खंजीर खुपसला. याला बेइमानीच म्हणावी लागेल. दुसरा शब्द नाही. पण, हा दगा, हा खंजीर उत्तमरावांपासून गोपीनाथजींपर्यंतच्या पाठित खुपसला गेला. सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीत हा वार होता. असंख्य कार्यकर्त्यांच्या समर्पणाशी, त्यागाशी झालेली ती दगाबाजी होती… भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने शिवसेनेच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी गाळलेल्या घामाशी ती गद्दारी होती.
भगवान कृष्णाच्या कूटनितीची शेकडो उदाहरणे आहेत. फरक फक्त इतकाच की, धर्मावर प्रेम करणारे याला कूटनिती म्हणतात अधर्मावर प्रेम करणारे याला बेईमानी म्हणतात… ‘परित्राणाय साधूनाम’…. हे नुसते चालणार नाही, तर ‘विनाशायचं दुष्कृताम्’ हे पूर्णत्त्व आहे… नैतिक, अनैतिकतेचा प्रश्न विचारणार्यांनी हे ध्यानात घेतले पाहिजे.
2019 ला सुरुवात तुम्ही केली… लोकशाहीची, जनादेशाची हत्या झाली. लोक आरोप करतात, आम्ही पक्ष फोडले. पक्ष फोडायला एकनाथ शिंदे, अजितदादा छोटे नेते नाहीत. ज्या-ज्या वेळी अन्याय होईल, त्या-त्या वेळी एकनाथ शिंदे जन्माला येतात.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन जो जो येत असेल त्याचे स्वागत केलेच पाहिजे. पण यात तुष्टीकरण करणाऱ्यांचे स्वागत होणार नाही.
परवा आमचे मित्र नाना पटोले म्हणाले, अजित पवार हे विभिषण आहेत. मला फार आनंद झाला. अजितदादा जर विभिषण असतील, तर आपण कोण? आणि ते जेथून आले, ते कोण?
हम छेडते नही… छेडा तो छोडते नही… दगाबाज्यांना माफी नाहीच… हा आमच्यावर शिवरायांचा संस्कार.
आपल्याला संपूर्ण 288 मतदारसंघात काम करायचे आहे. आपल्यालाही जिंकायचे आहे आणि सर्व सहकारी पक्षांनाही निवडून आणायचे आहे. आपण बेईमान नाही.
भारत आता वेगाने प्रगती करीत असताना अनेक षडयंत्र चालले आहेत. विश्वास हीच आपली शिदोरी आहे. आपला नेता मजबुत आहे. जगात नावलौकिक लाभलेले नरेंद्र मोदीजी हे आपले, देशाचे वैभव आहेत. पुढच्या काळात परिश्रम तुम्हाला भाजपासाठी नाही भारतासाठी करायचे आहेत.
तुम्ही बनवले म्हणून मी नेता. मी नेता म्हणून जन्माला आलो नाही.
आपल्या महिला आघाडीने सातत्याने उत्तम काम केले आहे. मोठा संघर्ष केला आहे. भाजपाच्या 2024 महाविजयात सुद्धा महिलांचा वाटा मोठा असेल.
( माहितीसाठी भाषाणाची लिंक: https://youtube.com/live/qbT6RIwgU3E?feature=share8 )