मुंबई, 3 फेब्रुवारी
देवेंद्र फडणवीस यांनी केले लालकृष्ण अडवाणी यांचे अभिनंदन
भारताचे माजी उपपंतप्रधान आणि आमचे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर होणे, या एका कणखर व्यक्तिमत्त्वाचा यथार्थ सन्मान आहे, असे सांगत या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे आणि लालकृष्ण अडवाणींचे अभिनंदन केले आहे.
लालकृष्ण अडवाणी यांनी ‘लोहपुरुष’ या नात्याने एक कणखर गृहमंत्री म्हणून देशाची सेवा केली. विशेषत: श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली. सुमारे 6 दशके त्यांनी राजकारणात घालविली. एक निष्कलंक व्यक्तिमत्त्व तर ते आहेतच, शिवाय राष्ट्रसेवेत त्यांची मोठी भूमिका राहिली आहे. राजकारणात अशाप्रकारचे चारित्र्य त्यांनी सांभाळले आणि विविध विषयांचा त्यांचा सातत्याने व्यासंग राहिला. त्यांना भारतरत्न ही उपाधी जाहीर झाल्याबद्दल मला व्यक्तिगत आनंद झाला आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.