मुंबई, २४ मे
जलसाक्षरतेसाठी महाजलदूत नेमणार
पावसाळा जवळ आला असल्यामुळे जलयुक्त शिवार अभियान 2.0 ची कामे गतीने करा. ही काम पूर्ण झाल्यानंतर या गावांमध्ये जलसाक्षरता देखील वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. जलसाक्षरता वाढावी यासाठी महाजलदूत नमेण्यात येणार आहेत याबाबत मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात येतील असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जलयुक्त शिवार अभियान 2.0, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी आढावा बैठक घेतली आणि संवाद साधला.
यावेळी अपर मुख्य सचिव, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यासह मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवार योजना 2.0 मध्ये अनेक बदल करून ही योजना परिपूर्ण बनविण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या योजनेत जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कामे पूर्ण करण्याबाबत यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेतली गेली आहे.
आज ‘पाणी‘ यावर काम करण्यासाठी अनेक खाजगी संस्था पुढे येत आहेत त्यांच्या मदतीने व लोकांच्या सहभागाने या योजनेला चांगली गती मिळत आहे.
कोणतेही काम करताना लोकांना ते आपले वाटणे महत्वाचे असते त्यामुळे या योजनेत लोकसहभाग वाढविणे गरजेचे असते. प्रशासन आणि जनतेचा संवाद वाढला की कामाचे यश नक्की असते. जलयुक्त शिवारची कामे पूर्ण झाली की काम संपणार नाही तर लोकांमध्ये पाण्याचा वापर जबाबदारीने करण्याबाबत योग्य साक्षरता असणे गरजेचे आहे.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, जलपरिपूर्ण गाव तयार करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी काम होणे गरजेचे आहे. जलयुक्त शिवार योजना 2.0 मध्ये कृषी विभागाचा सहभाग वाढावा यासाठी नवीन अधिसूचना काढण्यात येईल.
या कामांसाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीमधून देखील घेता येईल याबाबतच्या मंजूरी देण्यात येईल मात्र ही कामे गतीने करावीत.
काम करताना येणाऱ्या अडचणीवर मात करून काम करा. पाण्याचे काम हे खुप चांगले काम आहे.
आज खाजगी संस्था स्वयंसेवी संस्था बीजेएस, नाम, पानी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धा यामुळे या कामांना एक ग्लॅमर प्राप्त झाले आहे प्रशासनाला यामुळे लोकांचे सहकार्य मिळत आहे तरी लोकांचा सहभाग वाढवून ही कामे पूर्ण करावीत. गावातील सर्व कामे पूर्ण होतील याबाबत खबरदारी घ्यावी.
#Devendrafadnavis #Maharashtra #JalYuktShivar