मुंबई, 29 फेब्रुवारी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना
माजी आमदार गोविंदराव आठवले यांच्या निधनाने कायद्याचा निष्णाण अभ्यासक हरपला असून, माझ्या राजकीय कारकिर्दीतील प्रारंभीच्या काळातील मार्गदर्शक मी गमावला आहे, अशी शोकसंवेदना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
मी पहिल्यांदा नगरसेवक झालो, तेव्हा गोविंदराव हे मला सातत्याने मार्गदर्शन करायचे. माझे वडिल स्व. गंगाधरराव यांच्याशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते. गोविंदराव भारतीय मजदूर संघाच्या पहिल्या कार्यकारिणीत राष्ट्रीय मंत्री होते. भारतीय मजदूर संघाचे संविधान तयार करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. मला आठवते, अलिकडेच म्हणजे डिसेंबर महिन्यात उपसभापती नीलम गोर्हे यांनी त्यांचा सत्कार केला, तेव्हा स्व. दत्तोपंत ठेंगडी यांचेच चरित्र त्यांनी नीलमताईंना भेट म्हणून दिले होते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात त्यांच्या मनात श्रमिक होता. कायद्याचे निष्णात अभ्यासक असलेल्या गोविंदरावांनी अनेक श्रमिक संघटनांचे संविधान तयार करुन दिले. कायद्यावरील सुमारे 25 लहान-मोठी पुस्तके त्यांनी लिहिली. प्रारंभापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले गोविंदराव विदर्भ पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर गेले होते. धरमपेठ गृहनिर्माण संस्थेशीही त्यांचा अतिशय जवळचा संबंध होता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.