मुंबई, 24 जुलै
महायुतीतील सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वास्तव ओळखले पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहतील, असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
माध्यमांमध्ये सद्या विविध चर्चा घडत आहेत, त्यासंदर्भात पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता विधानभवन, मुंबई येथे ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, असे कुठल्याही पक्षातील नेते, कार्यकर्त्यांना वाटणे स्वाभाविक आहे.
राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांना त्यांचा नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटेल, भाजपातील कार्यकर्त्यांना त्यांचा नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटेल. त्यात वावगे काहीच नाही. पण, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत आणि तेच राहणार आहेत.
मुख्यमंत्रीपदामध्ये कोणताही बदल होणार नाही, हे या महायुतीतील सर्वांत मोठ्या पक्षाचा नेता म्हणून मी स्पष्ट करतो. यासंदर्भात अजित पवार आणि मी आमच्या दोघांच्याही मनात पूर्ण स्पष्टता आहे. महायुतीची चर्चा झाली तेव्हा अजितदादांना स्पष्टपणे याची कल्पना देण्यात आली आणि त्यांनी ती स्वीकारली. त्यांनी स्वत: आपल्या वक्तव्यात हेच स्पष्टपणे सांगितले आहे. आमच्या महायुतीतील नेत्यांना माझे अतिशय स्पष्टपणे सांगणे आहे की अशाप्रकारचे मिश्र संकेत देणे त्यांनी तत्काळ बंद केले पाहिजे. नेत्यांच्या मनात कुठलाही संभ्रम नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनीही संभ्रम ठेऊ नये.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जे बोलले, अशी पतंगबाजी अनेक विरोधी नेते करीत आहेत. सध्याच्या वातावरणात अनेक राजकीय नेते भविष्यवेत्ते झाले आहेत. त्यांनी कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी महायुतीत त्यामुळे कोणताही परिणाम होणार नाही. 10 तारखेला काहीही होणार नाही, झालेच तर आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार मुख्यमंत्री ठरवतील, त्या तारखेला होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कॅसिनो संदर्भात एक कायदा 70 च्या दशकात तयार करण्यात आला होता. पण, महाराष्ट्रात आम्ही कॅसिनो सुरु होऊ देणार नाही. तो कायदा आम्ही निरस्त करणार आहोत, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, सीएजीच्या अहवालात संपूर्ण वास्तव आले आहे. महापालिकेत भ्रष्टाचाराचे कुरण होते, जाणिवपूर्वक अंधत्त्व पत्करुन त्याकडे डोळेझाक करण्यात आली. सध्या निघत असलेले घोटाळे ही एक झांकी आहे, असे अनेक घोटाळे अजून बाकी आहेत.