Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला

By Devendra Fadnavis on April 4th, 2025
Df_Press-Release-Page_Feature-Image

press release

मुंबई, 4 एप्रिल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनोजकुमार यांना श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतील एका महान व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. चित्रपटांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि भारतीय समाजजीवन जनमानसावर बिंबवणाऱ्या या अष्टपैलू आणि भारतकुमार हे नाव खऱ्या अर्थाने सार्थकी लावणाऱ्या कलाकाराला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

‘शहीद’ मध्ये भगतसिंग साकारून मनोजकुमार हे देशाला सुपरिचित झाले. त्यानंतर शेतीसारखा विषय त्यांनी चित्रपटातून हाताळला आणि ‘मेरे देश की धरती’ सारखे गीत आजही प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला त्याच अभिमानाने ऐकले जाते. त्यांच्या ‘पुरब और पश्चिम’ सारख्या चित्रपटांनी तर जागतिक पातळीवर अनेक विक्रम प्रस्थापित केले. ‘रोटी कपडा और मकान’ सारख्या चित्रपटांनी त्यांनी सामाजिक विषयांना हात घातला. उपकार, क्रांती असे अनेक चित्रपट त्यांनी गाजवले. त्यांनी आपल्या प्रत्येक कलाकृतीतून देशप्रेमाची आणि राष्ट्रीयत्वाची भावना रुजवण्यासाठी प्रयत्न केले. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून त्यांची जागा कधीही भरून निघणार नाही. मनोजकुमार यांनी दिग्दर्शन, पटकथा-गीत लेखन, संकलन या क्षेत्रातही काम केले. त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि कोट्यवधी चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो, अशी मी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.