Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना श्रद्धांजली

By Devendra Fadnavis on December 23rd, 2024
Df_Press-Release-Page_Feature-Image

press release

मुंबई, 23 डिसेंबर

मुख्यमंत्री सचिवालय ( जनसंपर्क कक्ष)

वास्तववादी चित्रपट निर्मितीचे पितामह

भारतीय चित्रपट सृष्टीत वास्तववादी चित्रपट निर्मितीचे समांतर पर्व आणणारे, पितामह म्हणून प्रख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल अजरामर राहतील, अशा भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ दिग्दर्शक पद्मभूषण श्याम बेनेगल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

चित्रपट माध्यमाचे सामर्थ्य ओळखून भारतीय चित्रपट सृष्टीच्या विकासात, वैभवात भर घालण्याचे त्यांचे योगदान अमूल्य असेच आहे. त्यांच्या कलाकृतींनी भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करून दिली. कर्नाटक कोकणी कुटुंबातून आलेल्या दिवंगत बेनेगल यांनी छायाचित्रकार असलेल्या वडिलांनी भेट म्हणून दिलेल्या कॅमेराद्वारे वयाच्या बाराव्या वर्षीच चित्रपट निर्मितीला सुरुवात केली. अंकुर, द सिडलींग, मंथन, मंडी, जुनून यांसारख्या अनेक चित्रपटांनी भारतीय चित्रपट सृष्टीत वास्तववादी निर्मितीचे पर्व आणले. त्यांनी माहितीपट, जाहिरात पट निर्मितीतही आपला ठसा उमटवला. यातही त्यांची लेखनशैली आणि मांडणी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. समांतर चित्रपट चळवळीला बेनेगल स्पर्श आणि विचार देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या चित्रपटातून सर्वसामान्यांचे जगणे पडद्यावर आले. सहजता हे त्यांचे वैशिष्ट्य नव्हते तर कला आणि त्यांच्या जगण्याचे ते सूत्र होते. बेनेगल यांनी अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती तर केलीच त्याचबरोबर भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक नामवंत कलाकार दिले. त्यांच्या दिग्दर्शकीय नजरेतून अनेक कलाकार घडले. चित्रपटसृष्टीला आधुनिक वळण देणाऱ्या दिग्गज दिग्दर्शकांच्या प्रभावळीत श्याम बेनेगल अग्रणी होते. त्यांच्या कलाकृतींचे, शैलीचा अभ्यास रसग्रहण आजही कुठे ना कुठे सुरू असते, हीच त्यांच्या कलाविष्काराची महत्ता आहे. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीचा एक मार्गदर्शक अध्वर्यू काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने चित्रपट निर्मिती, कला क्षेत्राचे भरून न निघणारी हानी झाली आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.