चिंचवड, 23 फेब्रुवारी
ही निवडणूक आली नसती तरच अधिक आनंद झाला असता. स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या सावलीसारखे काम अश्विनीताईंनी केले. आज त्यामुळेच संपूर्ण ताकदीने जनता त्यांच्या बाजूने उभी आहे.
पुणे हे अतिशय गतीने विकसित होणारे शहर. आयटी, शिक्षण, नागरी सुविधा अशा सर्वच क्षेत्रात मोठ्या वेगाने प्रगती पुण्याने केली. शहरीकरण हा कायमच अभिशाप समजला गेला. पण, शहरीकरण हा शाप नाही, तर विकासाच्या नव्या संधी आहेत.
नरेंद्र मोदीजी यांचे सरकार आले आणि ते पंतप्रधान झाल्यापासून शहर विकासाला एक नवा आयाम प्राप्त झाला. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा शहरांसाठी योजनांचा काळ सुरू झाला. अमृत, स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत अशा अनेक योजनांची आखणी झाली. त्यासाठी निधी देणे प्रारंभ झाले.
पिंपरी-चिंचवडमध्ये आंध्र धरणाचे काम सुरू केले. 250 एमएलडी पाणी मिळणार. कचरा प्रक्रिया, सांडपाणी व्यवस्थापन यावर सुद्धा काम सुरु आहे. शहर वाहतूक, मेट्रो अशा प्रकल्पांवर काम सुरू झाले. शहरे ही नागरिकांना सुखात्मक करण्याचा प्रयत्न झाला.
सध्या विविध मेट्रोंचे काम सुरू आहे. ती एकात्मिक प्रणालीवर आल्यावर त्याचा मोठा लाभ नागरिकांना होणार. पुणे रिंगरोडचे काम सुद्धा युद्धपातळीवर सुरू आहे. तो मल्टीमॉडल कॉरिडॉर असेल. वाहतूक कोंडीवर हा रामबाण उपाय असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्या दिशेने जाताहेत, त्याच दिशेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी चालतो आहे. चिंचवडचा लोकप्रतिनिधी सुद्धा त्याच दिशेने चालणारा हवा. आमचे व्हीजन भाषणापुरते नाही, तर प्रत्यक्ष कृतीत साकारणारे आम्ही आहोत.
(माहितीसाठी भाषणाची लिंक: https://www.youtube.com/live/3EGpim21DpA?feature=share )