गांधीनगर, 20 सप्टेंबर
भारतीय जनता पार्टी, सुशासन विभागातर्फे गांधीनगर, गुजरात येथे आयोजित राष्ट्रीय महापौर संमेलनाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने या संमेलनाचा प्रारंभ झाला. यात आजच्या एका सत्रात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा संबोधन झाले. ‘महानगर प्रशासनात महापौरांची भूमिका’ हा त्यांचा विषय होता.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महापौर या शब्दाची भेट स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्याला दिली. महापालिका प्रशासनात महापौर आणि नगरसेवक हे अतिशय महत्वाचे घटक असतात. नरेंद्र मोदी यांनी सुशासनाचा रचलेला पाया, नव्याने नगरविकासाच्या तयार झालेल्या योजना, शहरी विकास हे आव्हान नाही, तर त्याकडे संधी म्हणून बघण्याची गरज, विकासात शहराच्या विकास आराखड्याची भूमिका, संसाधनांचा सुयोग्य वापर, हरित ऊर्जा, राजकीय इच्छाशक्ती, नावीन्यपूर्ण प्रयोग, शहरवासियांशी सातत्याने संवाद अशा अनेक विषयांवर देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला आणि विविध प्रश्नांना उत्तरे सुद्धा दिली.
देशभरातील सुमारे 18 राज्यातील 125 वर महापौर या राष्ट्रीय महापौर संमेलनात सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने या राष्ट्रीय महापौर संमेलनाला प्रारंभ झाला, तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या संमेलनाचे उदघाटन केले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील, डॉ. विनय सहस्रबुद्धे, विजयाताई रहाटकर आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते. दोन दिवसांची ही परिषद असून त्यात विविध नेते आणि तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. केंद्र सरकारच्या महापालिकां साठीच्या योजना, त्याची अंमलबजावणी, विविध महापालिकेतील यशस्वी योजनांचे सादरीकरण असे अनेक सत्र या राष्ट्रीय महापौर संमेलनात होणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भाषणाने उद्या या संमेलनाचा समारोप होईल.