वाराणसी, 12 मे
काशी जंगमवाडी मठ येथे आयोजित श्री 1008 जगदगुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या जन्मअमृत महोत्सवासाठी आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे वाराणसी येथे उपस्थित होते.
श्री सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामी, श्री 1008 डॉ. चन्नासिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी, डॉ. मलिक्कार्जुन शिवाचार्य महास्वामी, खा. जयसिद्धेश्वर स्वामी, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. डॉ. अवधेशसिंग, विश्वनाथ चाकोते, माजी मंत्री कृपाशंकर सिंह इत्यादी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाच डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांचाही जन्म अमृतमहोत्सव साजरा होतोय, ही अतिशय आनंदाची बाब आहे. या सोहोळ्यात उपस्थित राहून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करता आले, हे मी भाग्य समजतो. जंगमवाडी मठाचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. आमच्या आचार्य आणि संतांनी आमची प्राचीन संस्कृती, ज्ञान केवळ जिवंतच ठेवले नाही, तर त्याचा सर्वदूर प्रसार केला. जगदगुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी तर रशियापर्यंत प्रवास करून आपल्या ज्ञानाचा प्रसार केला. आमच्या संस्कृतीत जीव आणि शिव हे वेगळे नाहीत. शिव हाच आमचा आत्मा आहे.
या काशी जंगमवाडी मठाचे उत्तराधिकारी म्हणून आता श्री 108 डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज असणार आहेत. ते मूळचे सोलापूरचे आहेत. त्यांच्याही बाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
काशी विश्वनाथाचे दर्शन
दरम्यान, यापूर्वी आज सकाळी त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेत बाबा विश्वनाथांची पूजा-अर्चना केली आणि सर्वांच्या मांगल्यासाठी प्रार्थना केली. वाराणसीतील दुर्गा मंदिरात सुद्धा दर्शन घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयाला भेट देत तेथे भाजपा कार्यकर्त्यांशी चर्चा केली. काशी पत्रकार संघाच्या सदस्यांची भेट घेतली आणि काशी महाराष्ट्र सेवा समितीच्या पदाधिकार्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांचा यथोचित सन्मान केला.