मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
जून २०२४
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’द्वारे महाराष्ट्रातील माता-भगिनींचा सन्मान!
महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, आरोग्य आणि पोषणासहित सर्वांगिण विकास व्हावा यासाठी महायुती सरकारने जून २०२४ च्या अतिरिक्त संकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेद्वारे सरकार राज्यातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देत आहे. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून आतापर्यंत दोन टप्प्यात लाभार्थी महिलांना या योजनेतील पैशांचे वाटप करण्यात आले.
२८ जून २०२४
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा
महायुती सरकारने २८ जून २०२४ रोजी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाच्या भाषणातून अर्थमंत्र्यांनी महिलांची आरोग्यविषयक आणि आर्थिक स्थिती सुधारण्याच्यादृष्टिने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा केली. या योजनेतून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये थेट बँकेद्वारे दिले जाणार आहेत. या योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिने महिला व बालविकास विभागाने त्याच दिवशी म्हणजे २८ जून २०२४ रोजी या योजनेचा शासन निर्णय प्रसिद्ध केला.
२८ जून २०२४
योजनेचा उद्देश!
राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करुन त्यांच्या रोजगार निर्मितीस चालना देणे. तसेच त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे. त्यांच्या सशक्तीकरणास चालना देणे. त्याचबरोबर राज्यातील महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने ही योजना आणली.
२८ जून २०२४
योजनेसाठी आवश्यक पात्रता
सरकारने २८ जून २०२४ च्या पहिल्या शासन निर्णयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२४ अशी जाहीर केली होती. पण योजनेला महिलांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता अर्ज भरण्याची मुदत सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली होती. पण त्यानंतरही कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी वेळ लागत असल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली.
२ जुलै २०२४
योजनेतील नियमांमध्ये बदल करण्याबाबत बैठक
राज्य सरकारने महिलांसाठी घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर समाजातील वेगवेगळ्या घटकांतील महिलांकडून याच्या नियमांमध्ये बदल करण्याबाबत सूचना आल्या. तसेच सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबतही त्यामध्ये सुधारणा करण्याच्यादृष्टिने मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २ जुलै २०२४ रोजी बैठक घेऊन योजनेच्या पात्रतेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
३ जुलै २०२४
२१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिला लाभार्थी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील नियमांमध्ये सुधारणा करून सुधारित शासन निर्णय ३ जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. नवीन नियमानुसार राज्यातील २१ ते ६५ वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तस्चे त्या कुटुंबातील फक्त एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकते. त्याचबरोबर कोणाकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर, त्या महिलेने १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र सादर करणे अपेक्षित आहे. तसेच शासन निर्णयातील ५ एकर शेतीची अट देखील मागे घेण्यात आली.
१७ ऑगस्ट २०२४
पहिला हप्ता बहिणींच्या खात्यात जमा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना १७ ऑगस्टला पहिला हप्ता देण्यात आला. महिलांच्या बँक खात्यात दोन जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्यांचे ३ हजार रुपये १ कोटी ७ लाख महिलांच्या खात्यात एकाच दिवशी जमा झाले. याचा शुभारंभ पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातून पार पडला.
३१ ऑगस्ट २०२४
दुसऱ्या टप्प्यात ५२ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील पैशांचे वाटप ३१ ऑगस्ट २०२४ रोजी नागपूरच्या रेशीमबाग येथील कार्यक्रमात करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ५२ लाख महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्यांचे ३ हजार रुपये पाठवले गेले.
१ सप्टेंबर २०२४
दोन टप्प्यात १ कोटी ५९ लाख महिलांना वाटप
महायुती सरकारने जून २०२४ च्या अतिरिक्त संकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. त्याच दिवशी सरकारने या योजनेचा शासन निर्णय प्रसिद्ध केला होता. राज्य सरकारने जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्यांचे पैसे दोन टप्प्यात दिले. या योजनेचा आतापर्यंत १ कोटी ५९ लाख महिलांनी लाभ घेतला. यासाठी सरकारने ४७८७ कोटी रुपयांचे वाटप केले. सरकारने या योजनेद्वारे २.५ कोटी महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
२ सप्टेंबर २०२४
३० सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज
राज्य सरकारने या योजनेची अंमलबजावणी १ जुलैपासून सुरू केली आणि १५ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली. पण अर्ज भरण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागल्याने, तसेच ई-केवायसी प्रक्रिया आणि बँकेत खाते उघडणे या प्रक्रियेत वेळ लागत असल्याने महिलांकडून अर्ज भरण्याची तारीख वाढवण्यासाठी मागणी होऊ लागली. त्यामुळे राज्य सरकारने ३ जुलै २०२४ च्या शासन निर्णयाद्वारे अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२४ अशी निश्चित करण्यात आली. दरम्यान, राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी २ सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार अर्ज भरण्याची अंतिम तारीख सप्टेंबर २०२४ अशी करण्यात आली.