रामलला हम आयेंगे, मंदिर भव्य बनायेंगे…
बच्चा बच्चा राम का, जन्मभूमी कें काम का…
एकही नारा एकही नाम, जय श्रीराम-जय श्रीराम…
अनंत नारे, पण ध्येय एक….या नार्यांवर त्यावेळी टीकाही झाली. कट्टरतावादाचे आरोप झाले. पण, राष्ट्रीय अस्मितेचा विचार प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात दृढ होता. जो भाव राष्ट्रासाठी प्राण अर्पण करण्याच्या मानसिकतेचा असतो, अगदी तसाच भाव प्रभूश्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिर निर्माणासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा होता. आज जेव्हा 5 ऑगस्ट 2020 रोजी आपल्या सर्वांच्या आयुष्यातील तो ऐतिहासिक क्षण प्रत्यक्षात साकारतोय्, आपले पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीत तो क्षण संपूर्ण जगाला समर्पित होतोय्, त्याची साधी कल्पना सुद्धा आयुष्याला पूर्णत्त्व प्रदान करणारी आहे.
मला आठवतात त्या तीन कारसेवा. (कारसेवा हाच शब्द प्रचलित झाल्याने तोच वापरतोय्. प्रत्यक्षात ती होती करसेवा. पवित्र कार्याला आपले हात लागणे, हा त्याचा अर्थ). पहिली कारसेवा 30 ऑक्टोबर 1990 ची, दुसरी 6 डिसेंबर 1992 ची आणि तिसरी 2002 ची. स्वत:ला अतिशय भाग्यवान समजतो की, या दोन्ही कारसेवांमध्ये योगदान देता आले. आजही त्यातील प्रत्येक आठवणी डोळ्यासमोर सहज तरळून जातात, तेव्हा सर्वांगावर रोमांच उभे राहतात. तसे तर वयाच्या 18 व्या वर्षापासूनच मी रामशिलापूजनाच्या निमित्ताने या चळवळीत जोडला गेलो. त्यावेळी खंड, उपखंड आणि प्रखंड अशी रचना विश्व हिंदू परिषदेच्या वतीने केली गेली. त्यात एका खंडाच्या प्रमुखपदाची जबाबदारी होती.
पहिली कारसेवा
पहिली कारसेवा झाली ती, 30 ऑक्टोबर 1990 ला. त्यावेळी वय 20 वर्षे. अ.भा. विद्यार्थी परिषदेचे काम तेव्हा करायचो. अयोध्येला जाण्याचा मार्ग म्हणजे व्हाया अलाहाबाद अर्थात आजचे प्रयागराज. रेल्वेने आम्ही अलाहाबादला पोहोचलो. तेथे देवराह बाबा आश्रमात गेलो. तेथे आमचे काही अधिकारी होते. पुढे जाण्याची व्यवस्था नसल्याने सत्याग्रह करून अटक करवून घ्यायची, असे त्यांनी सांगितले. पण आम्हाला पुढे जायचेच होते. मग त्रिवेणी संगमानजीकच्या सीताराम मंदिरात मुक्कामाची जागा शोधली. 5 ते 6 दिवस तेथेच मुक्काम. दररोज संतांचे आशीर्वचन आणि मार्गदर्शन. मंदिरातील पुजारी रोज दालखिचडी बनवायचे आणि तेच आमचे भोजन. मंदिरातील गच्चीवर आम्ही झोपायचो. पण, कडाक्याच्या थंडीचे दिवस. पार अकडून जायचो. शेवटी पुजार्यांना विनंती केली आणि त्यांनी आतमध्ये जागा दिली. सकाळी त्रिवेणी संगमावर स्नान आणि नंतर दिवसभर जनजागरण असा क्रम चालायचा.
‘परिंदा भी पैर नही मार सकता’, अशी गर्जना तत्कालिन मुख्यमंत्री श्री मुलायमसिंह यादव यांनी केली होती. कडेकोट बंदोबस्त सर्वत्र होता. अलाहाबादमधील वास्तव्यानंतर अखेर मुहूर्त ठरला. शंकराचार्यांच्या नेतृत्त्वात अयोध्येकडे कूच करायचे ठरले. सुमारे 30 कि.मी. पायी चालल्यानंतर, एका मोठ्या पुलावर आम्हाला अडविण्यात आले. पुलाच्या प्रारंभी आणि शेवटी पोलिस आणि दोन्हीकडे पाणी. काहींनी उड्या घेतल्या आणि रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला. त्यात काहींना आपले प्राण सुद्धा गमवावे लागले. लाठीमार आणि गोळीबार अशा दोन्ही कारवाया सुरू झाल्या. आयुष्यात हे सारे प्रथमच अनुभवत होतो. बंदुकीच्या गोळ्या चुकवत रस्त्यावर सारे ठाण मांडून बसले होते. बराच काळ संघर्ष झाल्यानंतर अखेर पोलिसांनी वाहने आणली आणि अटकसत्र प्रारंभ झाले. एका वाहनात आम्हालाही अटक करण्यात आली. येथून 500 कि.मी अंतरावर असलेल्या बदायू येथील कारागृहात डांबले गेले. आताचे केंद्रीय मंत्री संतोष गंगवार हेही आमच्यासोबत कारागृहात होते. थोडा थोडका नव्हे तर 14-15 दिवस आम्हाला या कारागृहात ठेवले गेले. मला आठवतं उत्तरप्रदेशातील एक आछूबाबू आमच्यासोबत कारागृहात होते. अतिशय प्रभावी भाषणं ते करीत. दुपारच्या सत्रात प्रत्येक बॅरेकमध्ये जाऊन भाषणं करून जनजागृती करायचो. त्यामुळे प्रत्येक बॅरेकमध्ये जाऊन संवाद साधता यायचा. गुजरातचेही काही लोक आमच्यासोबत होते. मला अजूनही त्यांच्या घोषणा आठवितात. ते म्हणायचे…
हिंदू रक्त ना टिपे टिपे
मंदिर बने ईटे ईटे
स्वावलंबनासोबत जगण्याचा आनंदच काही निराळा असतो. सकाळी शाखा लावायची, हनुमानचालिसाचे पठण करायचे. स्वत:चे कपडे स्वत: धुवायचे, स्वत:चे अन्न स्वत: शिजवायचे आणि नंतर संघटनेच्या कामासाठी वेळ द्यायचा. मला अजूनही आठवते, आमच्या एका सहकार्याने स्वत:चे कपडे स्वत: धुण्याची पाळी येऊ नये, म्हणून एका कैद्याला 5 रूपये देऊन कपडे धुण्यासाठी आणले. तेव्हा मी त्याला 10 रूपये दिले आणि परत पाठविले. आमच्या सुदैवाने कारागृह अधीक्षकाची दोन्ही मुलं कारसेवक होती. त्यामुळे जेलरकडून आम्हाला फार कोणता त्रास झाला नाही. बाहेर संचारबंदी असली की फार चांगले नाही, पण, संचारबंदी उठली की चांगले जेवण मिळायचे.
कारागृहातील ते 14-15 दिवस. आजही प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रसंग डोळ्यापुढे स्पष्टपणे येतो. याच कारागृहातून मी आईला एक खुशालीचे पत्र पाठविले होते, कारण त्याकाळी दुसरी कोणती संवाद यंत्रणा अस्तित्त्वात नव्हती. अर्थात ते पत्र मी नागपुरात पोहोचल्याच्या दुसर्या दिवशी पोहोचले. पण, मला अभिमान आहे की, आईने कायम प्रेरणा दिली. तुम्ही देशासाठी काहीतरी करता आहात ना तर खुशाल करा, असेच ती नेहमी सांगायची आणि आजही सांगते. याच बदायूच्या कारागृहातून मग आम्हाला लखनौला आणण्यात आले आणि तेथून रेल्वेने नागपूरपरतीचा प्रवास. चळवळीच्या उपयोगी तर आलो, पण, अयोध्येच्या भूमिवर पाय ठेऊ शकलो नाही, याची खंत आणि रूखरूख मनाला लागून होती.
6 डिसेंबर 1992
ही खंत फार दिवस बाळगावी लागली नाही. कारण, दोनच वर्षांनी दुसर्या कारसेवेची घोषणा झाली. 6 डिसेंबर 1992 चा दिवस ठरला. 30 नोव्हेंबरला आम्ही 250 कारसेवकांचा जत्था घेऊन अयोध्येकडे रवाना झालो. 1 तारखेला अलाहाबादला पोहोचलो. स्व. विलासजी फडणवीस, रवीजी जोशी हे त्यावेळी अलाहाबादेत महाराष्ट्रातून येणार्यांच्या व्यवस्थेत होते. एक दिवस मुक्काम केला. त्रिवेणी संगमावर स्नान केले आणि आता मंदिरासाठी बलिदान द्यावे लागले तरी द्यायचे, असा संकल्प आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केला.
दुसर्या दिवशी सकाळीच अयोध्येकडे कूच केली आणि अयोध्येत दाखल झालो सुद्धा. आमच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांचे कुणी नातलग पुजारी असल्याने काळाराम मंदिरात आमचा मुक्काम होता. 2 ते 6 डिसेंबर असा पूर्ण मुक्कामाचा कालावधी. त्याकाळी अयोध्येत सहा आसनी ऑटो असायचे. त्या ऑटोंमधून फिरायचे आणि संपूर्ण अयोध्येची परिक्रमा करीत ‘मंदिर वही बनाऐंगे’चे नारे देत जनजागृती करायची, हा दिवसभराचा क्रम राहत असे. त्या काळात नवनवीन नारे तयार करणे आणि ते लोकांमध्ये जाऊन लोकप्रिय करणे, हाही क्रम राहत असे. ‘जागो जागो तो हिंदू जागो तो…’ हे सांघिक गीत आम्ही गायचो आणि ते तेव्हा फार लोकप्रिय झाले. या संपूर्ण कालावधीत सुमारे 50 हजाराच्या आसपास कारसेवक या काळात अयोध्येत असतील. पाहता पाहता ही संख्या लाखांवर गेली. आमचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीजी, उमा भारतीजी, आचार्य धर्मेंद्रजी, महंत नृत्यगोपाल दास, साध्वी शिवा सरस्वती, साध्वी ऋतंभरादेवी अशा सार्या नेत्यांचीही उपस्थिती होती. ते वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करायचे. एकूणच हा संपूर्ण काळ एक अनोख्या उर्जेचा होता आणि आज त्या कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न साकार होते आहे.
5 तारखेला रात्री एक बैठक झाली आणि त्यात दुसर्या दिवशी सर्वांनी एकत्र येण्याचे ठरले. तणाव प्रचंड आणि पराकोटीचा होता. 6 तारखेला सकाळी सभेचे आयोजन करण्यात आले. सभेत विविध नेत्यांची भाषणं सुरू असतानाच अचानक एक जत्था एका घुमटावर चढला आणि पाहता-पाहता पहिला, दुसरा घुमट ध्वस्त झाला. तिसरा घुमट काही केल्या पडेचना. अखेर सायंकाळच्या सुमारास तो ध्वस्त झाला आणि लगेच मंदिर निर्माणाच्या कार्याने गती घेतली. लाखो लोकांनी आनंदोत्सव साजरा केला. लोक थकले होते, पण, रात्रभर श्रम करीत तात्पुरत्या मंदिराची निर्मिती साकारली होती. रामाचे केवळ नामस्मरण नवउर्जा प्रदान करीत होती. मनात कोणतेही भय नव्हते. कारसेवकांनी दिलेली सेवा, बलिदान अतुलनीय होते. पोलिस जरी खाकी गणवेशात असले तरी त्यांचीही भक्कम साथ होती. पोेलिस दिसले की आम्ही नारे द्यायचो, ‘कौन करे मंदिर निर्माण-पोलिस, पीएसी और जवान’. तेही आनंदी होत. आपल्या गुलामीचे प्रतीक संपले होते. तेथून नागपूरला परतलो. मार्गात रेल्वेवर हल्ले, दगडफेक त्यामुळे अडीच दिवसांनी नागपुरात पोहोचलो. 15 व्या शतकापासूनचा लढा अंतिम टप्प्यात आला होता. मंदिर तर तयार झाले होते. प्रतीक्षा होती, ती केवळ भव्य राममंदिराची. तो दिवस 5 ऑगस्ट 2020 च्या रूपाने साकारतोय्.
वयाच्या 20 व्या वर्षी पहिली आणि 22 व्या वर्षी दुसरी कारसेवा ते आज वयाच्या 50व्या वर्षी ते स्वप्न साकार होताना पाहताना एक अनोखे समाधान आहे. अयोध्येचे आंदोलन हे केवळ हिंदू संघटनशक्तीसाठी नाही, केवळ ईश्वरभक्तीसाठी नाही तर राष्ट्रीय अस्मितेसाठी होते. ज्या देशाच्या आदर्शाचे त्यांच्या जन्मस्थानी मंदिर उभे राहू शकत नाही, ते आपले दुर्बल्य दाखविणारेच होते. म्हणूनच हा केवळ भारतीय जनता पार्टीचा राजकीय अजेंडा आपण तेव्हाही मानत नव्हतो आणि आज तर नाहीच नाही. हा संत आणि समाजाचा लढा होता. या लढ्याला साथ देण्यासाठी इतरही पक्षांना सरसावता आले असते. पण, भारतीय जनता पार्टीने नुसता पाठिंबा दिला नाही, तर स्वत:ला या लढ्यात झोकून दिले. राष्ट्रीय अस्मितेसाठी झालेल्या या आंदोलनाची म्हणूनच इतिहास कायम नोंद घेत राहील आणि हा अध्याय सुवणार्र्क्षरात लिहिला जाईल. आज या आंदोलनाला मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे अधिष्ठान आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षाचा हा कळसाध्याय आहे. शिलान्यास मंदिराचा होईल पण, खरे तर यासाठीच्या चळवळीचा कळस ठेवला जाईल.
रामलला हम आये है, मंदिर भव्य बनायेंगे… हेच नारे पुन्हा तोंंडी येतात. कोरोना नसता तर या क्षणाचे ऐतिहासिक साक्षीदार होता आले असते. पण, म्हणतात ना उद्दिष्टपूर्ती महत्त्वाची असते. ती होतोय ना, बाकी सारे गौण आहे.॥ जय श्रीराम ॥
– देवेंद्र फडणवीस (एक कारसेवक)