Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

नागपूर जिल्ह्यातील 4 तालुक्यांना सिंचन, पिण्याचे पाणी

By Devendra Fadnavis on October 10th, 2024
Df_Press-Release-Page_Feature-Image

press release

मुंबई, 10 ऑक्टोबर

देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार, मंत्रिमंडळात निर्णय

नागपूर आयटीआयला संतश्री संताजी जगनाडे महाराजांचे नाव

संत कोलबा स्वामींच्या नावे यंत्रमाग महामंडळ

बांधकाम कामगारांना 5000 रुपये अनुदान

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून आज नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील कन्हान नदी वळण योजनेला मंजुरी प्रदान करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज ही मंजुरी प्रदान करण्यात आली.

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील कन्हान नदी वळण योजनेला मंजुरी दिल्यामुळे सावनेर, काटोल, नरखेड, कळमेश्वर तालुक्यांना सिंचन सुविधा मिळणार असून, एकूण 32,285 एकरला सिंचन मिळणार आहे. 1879.213 कोटी रुपयांची ही योजना आहे. या योजनेतून 3.25 टीएमसी इतकी मंजूर क्षमता असून, 3.04 टीएमसी सिंचनासाठी तर 0.03 टीएमसी पिण्याच्या पाण्यासाठी वापरणे प्रस्तावित आहे. 2016 मध्ये या योजनेला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

याशिवाय, गोंदियातील डांगुर्ली उच्च पातळी बंधार्‍यांसाठी 395.48 कोटी रुपयांना प्रशासकीय मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. 5861 हेक्टरला यामुळे सिंचन सुविधा मिळणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून हाती घेण्यात आलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा कार्यान्वित करण्याचाही निर्णय घेण्यात आला. गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे कठापूर), साताराला 5409.72 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजुरी देण्यात आली. यातून 32,937 हेक्टर क्षेत्राला सिंचन मिळणार आहे.

यंत्रमाग महामंडळाला संत श्री कोलबा स्वामी यांचे नाव

आजच्या मंत्रिमंडळात गवळी, कुंभार, शिंपी, लोहार, नाथपंथीय आदी विविध समाजघटकांसाठी महामंडळे गठीत करण्याचा निर्णय घेतानाच, यंत्रमाग महामंडळ सुद्धा गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या महामंडळाला विणकर समाजाचे आराध्य दैवत संत श्री कोलबा स्वामी यांचे नाव देण्याची सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि तसा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला. संत श्री कोलबा स्वामी यांनी विठ्ठलभक्ती, जातपात विरहित सर्वधर्म समभाव आणि मानवतावादाचा आदर्श निर्माण केला. सुमारे 300 वर्षांपूर्वीचा त्यांचा काळ. धापेवाडा येथे त्यांनी विठ्ठल-रुख्मिणी मूर्तीची स्थापना केली होती.

नागपूर आयटीआयला संताजी जगनाडे महाराजांचे नाव

नागपुरातील आयटीआयला संतश्री संताजी जगनाडे महाराजांचे नाव देण्याचा निर्णय सुद्धा राज्य मंत्रिमंडळाने घेतला. हे नाव देण्याची सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत केली होती. राज्यातील बांधकाम कामगार महामंडळाकडे नोंदित बांधकाम कामगारांना 5000 रुपये एकरकमी अनुदान देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. सुमारे 25 लाख बांधकाम कामगारांना याचा लाभ मिळणार आहे.