नागपूर, 3 डिसेंबर
नेमकी पनौती कोण, हे काँग्रेसला आज कळले असेल !
चारपैकी तीन राज्यात भाजपाला मिळालेले अभूतपूर्व यश हा मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पारदर्शी प्रामाणिकतेचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करतानाच, आजच्या निकालाने नेमकी पनौती कोण, हे काँग्रेसला आता कळून चुकले असेल, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
चार राज्यातील निवडणूक निकालांवर नागपूर येथे ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, जनतेचा नरेंद्र मोदीजी यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास आहे. ज्या पारदर्शी प्रामाणिकतेने त्यांनी गरीब कल्याणाचा अजेंडा राबविला, सरकार खऱ्या अर्थाने जनतेसाठी काम करते आहे, हा विश्वास त्यांनी जनतेच्या मनात निर्माण केला. या निकालाने जनतेने इंडी आघाडी आणि राहुल गांधी यांचा अजेंडा नाकारला हेही स्पष्ट झाले. नेमकी पनौती कोण हेही आता काँग्रेस पक्षाला कळाले असेल आणि त्यामुळे भविष्यात ते असे शब्द आता वापरणार नाहीत.
या निकालांचे वैशिष्ट्य म्हणजे भाजपची सरासरी मतांची टक्केवारी 10 टक्क्यांहून अधिकने वाढली आहे. छत्तीसगडमध्ये 14%, मध्यप्रदेशात 8% तर अगदी तेलंगणात 7% वाढली. 4 राज्यातील एकूण 639 जागांचे निकाल आज लागले. त्यात 339 जागा भाजपाने जिंकल्या. म्हणजे 50% पेक्षा अधिक जागा भाजपाने जिंकल्या. आता इंडी आघाडीची लवकरच ईव्हीएमवर बैठक होईल, असा टोला लगावताना ते म्हणाले की, जोवर या मानसिकतेतून काँग्रेस बाहेर पडत नाही, तोवर त्यांचे काहीच होऊ शकत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत तेलंगणात भाजपाचेच सर्वाधिक खासदार निवडून येतील. तीच स्थिती कर्नाटकमध्ये सुद्धा अनुभवास येईल. महाराष्ट्रात सुद्धा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश आम्ही मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या यशाबद्दल मी चारही राज्यातील नेते, कार्यकर्ते यांचे अभिनंदन करतो. नरेंद्र मोदी, अमितभाई शाह आणि जे. पी. नड्डा यांनी या निवडणुकीचे सुयोग्य नियोजन केले, त्यांचे मनापासून आपण अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले.