पुणे, 5 जानेवारी
आमचे वारकरी, धारकरी, माळकरी, टाळकरी हे सगळे बहुजन समाजातील आहेत आणि ते मांसाहार करीत नाहीत. मग जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य हा वारकरी आणि माळकर्यांचा अपमान नाही का, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विचारला.
जितेंद्र आव्हाडांच्या प्रभूश्रीरामांवरील वादग्रस्त विधानावर पुणे येथे माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता, ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य हे मुर्खपणाचे आणि निव्वळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी आहे. तसे करणे हा त्यांचा स्वभाव आहे. प्रभूश्रीराम हे बहुजनांचे आहेत, अभिजनांचे, दलितांचे, आदिवासींचे, सर्वांचेच आहेत. या देशात असे कुणीही नाही, जे प्रभूश्रीरामांना मानत नाहीत. त्यात शाकाहारी आणि मांसाहारी असा वाद करणे सर्वथा अनुचित आहे. आमचे वारकरी, माळकरी, टाळकरी, धारकरी हे सगळे बहुजन समाजातील आहेत. तेही सगळेच प्रभूश्रीरामांना मानतात. मग आव्हाडांचे वक्तव्य हा त्यांचा अपमान नाही का? विनाकारण विवाद उभा करणे आणि अशांतता तयार होईल असे वागणे, हे कुणाच्याच हिताचे नाही. जे स्वत:ला हिंदूत्त्ववादी असल्याचा कांगावा करतात, तेही पूर्णपणे मौन पाळून आहेत. त्यांनी साधा निषेधही करु नये, यावरुन ते किती बेगडी आहेत, हे सर्वांच्या लक्षात आले आहे, असेही ते म्हणाले.
बारामती अॅग्रोवरील कारवाईबाबत माध्यमांत आलेल्या बातम्या आणि त्यावरील प्रतिक्रियांसंदर्भात विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे विनाकारण स्वत:ला शहीद घोषित करण्याचे प्रकार आहेत. धाड पडली की नाही, हे मला माहिती नाही. त्यांनी काही केले नसेल तर घाबरण्याची गरज नाही. उगाच याला राजकारणाशी जोडण्याची गरज नाही.