नागपूर, दि.२६
नागपुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना पद्मश्री जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या रहाटे कॉलनी येथील निवासस्थानी भेट देत अभिनंदन केले. यावेळी त्यांनी डॉ. मेश्राम यांच्याशी आरोग्यासह विविध विषयावर चर्चा करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
एका छोट्याश्या गावातून आलेल्या व जगाच्या नकाशावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे प्रसिद्ध मेंदू रोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री हा नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला. मेंदू विकारावरील जनजागृतीसाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. यानिमित्त उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांची निवासस्थानी भेट घेतली.
डॉ. मेश्राम यांनी न्युरो सर्जन म्हणून केलेले कार्य अद्वितीय आहे. विदर्भातीलच नव्हे तर देशभरातील रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येतात. त्यांची ही अखंडित रुग्णसेवा अशीच पुढे सुरू राहो, असे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, डॉ. मेश्राम यांच्या पत्नी नम्रता, मुले डॉ. अविरल व आशय, अलंकार रामटेके यावेळी उपस्थित होते.