बुरहानपूर (मध्यप्रदेश), 10 नोव्हेंबर
देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यप्रदेशात सभा
निवडून आल्यावर काँग्रेस पक्ष स्वत:च्या परिवाराचा विचार करतो. पण, भाजपा हा देशाचा विचार करणारा पक्ष आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर संपूर्ण देशालाच आपला परिवार मानतात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मध्यप्रदेशातील बुरहानपूर येथे केले.
मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणूक प्रचार दौर्यात त्यांनी आज बुरहानपूर आणि इंदोर-3 या मतदारसंघात एकूण तीन सभांना संबोधित केले. खा. ज्ञानेश्वर पाटील, भाजपा उमेदवार अर्चना चिटणीस, इंदोर-3 चे उमेदवार गोलु शुक्ला, खा. उन्मेश पाटील, महापौर माधुरीताई पटेल आणि अन्य नेते यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्तीसगड, राजस्थानमध्ये दिलेली कोणते आश्वासन पूर्ण केले, हा प्रश्न काँग्रेसवाल्यांना विचारला पाहिजे. काँग्रेसला विसर पडण्याचा विकार आहे. निवडून आल्यानंतर ते दिलेली वचनं विसरुन जातात. निवडून आले की त्यांना केवळ स्वत:चा परिवार आठवतो. पण, संपूर्ण भारत हा मोदीजींचा परिवार आहे. गेल्या 60 वर्षांत लोकांना घरं मिळाली नाहीत. मोदीजींनी गरिब कल्याणाचा मोठा अजेंडा चालविला, ज्याचे युनोने कौतूक केले. लाखो-कोटी नागरिकांना विविध योजनांचे लाभ दिले. जात, धर्म, भाषा, पंथ न पाहता मोदीजींनी सर्वांना मदत दिली.
तापी मेगा रिचार्ज ही योजना जगातील एक आश्चर्य ठरेल, अशी योजना आहे. उमा भारती यांच्यासोबत आम्ही एक संयुक्त सर्वेक्षण केले. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील दोन्ही भागांना जलसमृद्ध करणारी ही योजना असेल. ही योजना आम्ही एसएलटीसीपर्यंत पोहोचविली आहे. मध्यप्रदेशात पुन्हा भाजपाचे सरकार आले की, ही योजना तडीस जाणार, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याकडे भारत वाटचाल करतोय, हे मोदींचे मोठे यश आहे. काँग्रेसमध्ये केवळ राममंदिराला विरोध नाही, तर रामालाही विरोध आहे. त्यांचा केवळ हिंदूत्त्वाला विरोध नाही, तर हिंदू या शब्दालाही विरोध आहे. हे आज काँग्रेसच्याच आचार्य प्रमोद यांनीच आज सांगितले आहे. अशांना सत्तेपासून दूरच ठेवले पाहिजे आणि भाजपाला निवडून देताना संपूर्ण बहुमत हेच उद्दिष्ट असले पाहिजे, असेही ते म्हणाले.