मोका (मॉरिशस) 28 एप्रिल
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण
मॉरिशस मराठी फेडरेशनला 8 कोटी रुपये
10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, महाराष्ट्रीयन समुदायासाठी स्वतंत्र कक्ष
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा
अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे मॉरिशसच्या मोका येथे आज मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींदकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर निनादला होता.
मॉरिशसमधील मराठी मंडली फेडरेशनला महाराष्ट्र भवनाच्या विस्तारासाठी 44 दशलक्ष मॉरिशस रुपये अर्थात 8 कोटी रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असल्याची घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मॉरिशसमधील 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. मॉरिशसमधील मराठी आणि महाराष्ट्रीयन बांधवांना राज्याशी सतत संपर्कात राहता यावे, यासाठी एक कक्ष स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी घोषित केले. अपार उत्साहात आणि संपूर्णपणे मराठी प्रतिबिंब असलेल्या या दिमाखदार सोहळ्यात मॉरिशसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ॲलन गानू, इतर मंत्री, मॉरिशसमधील भारताच्या उच्चायुक्त नंदिनी सिंगला, मॉरिशस मराठी मंडली फेडरेशनचे अध्यक्ष आसंत गोविंद प्रामुख्याने उपस्थित होते. मॉरिशसमधील मराठी भगिनी आणि बांधव पारंपारिक पोषाखात या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांनी अशाप्रकाराचा भारताबाहेर केलेला हा चौथा कार्यक्रम आहे. यापूर्वी लंडनमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, जपानच्या कोयासन विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तसेच रशियात लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण त्यांनी केले होते आणि आज हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमादरम्यान अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा सादर करण्यात आले. यात गोंधळ, शेतकरी नृत्य, पोवाडा, इत्यादी मराठी प्रकारांचा समावेश होता.
याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आजचा दिवस अतिशय भावनात्मक दिवस आहे. आमचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथे उभारण्यात आला, याबद्दल मी मॉरिशसच्या पंतप्रधान आणि येथील मराठी समुदायाचा आभारी आहे. आमचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि 12 कोटी महाराष्ट्रीयन जनतेच्या वतीने मी आपले आभार मानतो. आम्ही अनेक राजे पाहिले पण छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी, शौर्य, साहस अन्य कुणामध्ये नव्हते. म्हणूनच त्यांना ‘श्रीमंत योगी’ म्हणतात. जलसंवर्धन, समुद्री सामर्थ्य, किल्ले निर्मिती, प्रबंधन, अर्थव्यवस्था, कायदा-सुव्यवस्था इत्यादी क्षेत्रातील त्यांचे सामर्थ्य आणि चातुर्य आजही तितकेच मार्गदर्शक आहे. या पुतळ्याच्या उदघाटनासाठी 5000 कि.मी. दूर तुम्ही मला निमंत्रित केले आणि हे भाग्य मला लाभले, हे मी माझे पूर्वपुण्य समजतो. महाराजांनी आपल्याला ‘महाराष्ट्र धर्म’ शिकविला. देव-देश आणि धर्मासाठी जगण्याची शपथ वयाच्या 14व्या वर्षी होणारे आमचे हे आदर्श राजे आहेत. भारतीयांच्या मनामनात वीरतेचे बीजारोपण करण्याचे काम महाराजांनी केले. मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विविध घोषणांचे मॉरिशसच्या पंतप्रधानांनी यावेळी स्वागत केले आणि त्यांनीही यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गुणगौरव करणारे मनोगत व्यक्त केले.
(माहितीसाठी कार्यक्रमाची लिंक: https://youtu.be/RJObSM60Zcw )