Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

नागपूर पूरग्र्रस्तांना प्रत्येकी 10 हजार रुपये तातडीची मदत : फडणवीस

By Devendra Fadnavis on September 23rd, 2023
Df_Press-Release-Page_Feature-Image

press release

नागपूर, 23 सप्टेंबर

– दुकानांच्या क्षतीसाठी 50 हजारांपर्यंत मदत

– टपरीधारकांनाही 10 हजारापर्यंत मदत

– गाळ काढण्यासाठी राज्य सरकार निधी देणार

– तिघांचा मृत्यू, ऑरेंज अलर्टमुळे टीमची तैनाती कायम

– नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आढावा बैठक

कालच्या मुसळधार पावसामुळे उदभवलेल्या स्थितीचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर महानगरपालिकेत एका बैठकीतून आढावा घेतला. नागपूर पूरग्र्रस्तांना प्रत्येकी 10 हजार रुपये तातडीची मदत देण्यात येईल, दुकानांच्या क्षतीसाठी 50 हजारांपर्यंत मदत, टपरीधारकांना 10 हजारापर्यंत मदत, तर गाळ काढण्यासाठी राज्य सरकार निधी देणार, अशा घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर केल्या.

नागपुरात झालेल्या पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, शहराला अजूनही ऑरेंज अलर्ट दिला असल्यामुळे एनडीआरएफ, एसडीआरएफ टीमची तैनाती कायम ठेवण्यात आली आहे. या बैठकीला कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, प्रवीण दटके, संदीप जोशी, तसेच इतरही लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि इतर उपस्थित होते.

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अवघ्या 4 तासात झालेल्या मुसळधार पावसाने आणि त्यातही केवळ 2 तासात 90 मि.मी. पाऊस झाल्याने अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आणि नागनदी, पिवळी नदी लगतचा परिसरात पाणी शिरले. यामुळे रस्ते, पुलांची क्षती झाली. नाल्याजवळच्या भींती पडल्या, घरात पाणी शिरले, त्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले. सुमारे 10 हजार घरांमध्ये पाणी शिरल्याचा प्रारंभिक अंदाज आहे. त्यांना तातडीची मदत 10 हजार रूपये देण्यात येईल. गाळ काढण्यासाठी राज्य सरकार निधी देईल. जेथे दुकानांची क्षती झाली, त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत मदत देणार. टपरी व्यवसायिकांना नुकसानीसाठी 10 हजारापर्यंत मदत देण्यात येईल. शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याने सर्व टीमची तैनाती कायम ठेवण्यात आली आहे. पोलिस विभाग सुद्धा सज्ज आहे.

आज या स्थितीनंतर वीज बंद करण्यात आली होती, ती बहुतेक ठिकाणी पुन्हा सुरु करण्यात आली आहे. 14 ट्रान्सफॉर्मर अजून सुरु केलेले नाहीत कारण, तेथे पाणी कमी होण्याची वाट पाहिली जात आहे. तेथे ओलावा कायम आहे. कुठलाही अनर्थ होऊ नये, म्हणून वीज बंद आहे. सकाळपर्यंत ती सुरु करण्यात येईल, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पहिल्या तीन तासातच लोकांना बाहेर काढण्याचे काम प्रशासनाने केले. एनडीआरएफ, एसडीआरएफचा यात मोठा वाटा आहे. रिस्पॉन्स टाईम हा चांगला होता आणि त्याचे कौतूक केले पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.