मुंबई, 22 नोव्हेंबर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूरकरांना मोठा दिलासा
नागपूर शहरात बांधकाम परवानगीसाठी विकास शुल्कात 100 टक्के वाढ करण्याचा स्थानिक प्रशासकीय पातळीवरील निर्णय रद्द करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
नागपूरच्या विविध प्रश्नांवर काल मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या निर्णयामुळे नागपूरकर जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. महापालिका सभागृहाची मान्यता नसताना प्रशासकीय पातळीवर हा निर्णय घेण्यात आला होता. बांधकाम परवानगीसाठी एमआरटीपी कायद्यांतर्गत विकास शुल्कात 2020 मध्ये अचानकपणे 100 टक्के वाढ करण्यात आली होती आणि त्यातही 2016 पासून वसुली करण्यास सांगण्यात आले होते. यामुळे सामान्य नागरिक आणि बांधकाम व्यावसायिकांवर मोठे संकट आले होते. पूर्वी हे विकास शुल्क निवासी बांधकामासाठी 2 टक्के आणि वाणिज्यिक बांधकामासाठी 4 टक्के आकारण्यात येत असे. पण, अचानक त्यात 100 टक्के वाढ करून ते दुप्पट करण्यात आले. 22 जुलै 2021 रोजी तत्कालिन सत्तारुढ पक्षनेते अविनाश ठाकरे यांनी सभागृहात एक ठराव मांडून ही दरवाढ रद्द करण्याचा ठराव पारित केला. मात्र, प्रशासकीय पातळीवर हा वाढीव दर आकारणे सुरुच होते. तत्कालिन आयुक्तांनी महापालिकेचा हा ठराव विखंडित करण्यासाठी सरकारला पाठविला होता. या दरवाढीविरोधात आमदार प्रवीण दटके यांनी उच्च न्यायालयात एक याचिका सुद्धा दाखल केली होती. कालच्या बैठकीत प्रवीण दटके यांनी ही बाब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी हा निर्णय रद्द करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. यामुळे नागपूरच्या सर्व स्तरातील नागरिक, विकासक, बांधकाम करू इच्छिणार्या संस्थाना वाढीव शुल्कापासून दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.